गोव्याची जैवविविधता

गोव्यात जी सहा अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे, त्यातल्या जैविक संपदेची श्रीमंती अधोरेखित करण्याच्या प्रयत्नांना राजाश्रयाबरोबर उत्स्फूर्तरित्या स्थानिक लोकसहभाग लाभ‌ला तर नैसर्गिक सौदर्य आणि श्रीमंतीसाठी ख्यात असलेले गोवा, देश-विदेशातील जनतेसाठी आकर्षण बिंदू ठरेल.

Story: विचारचक्र |
21st May, 10:35 pm
गोव्याची जैवविविधता

आज देश-विदेशात जागतिक पर्यावरण दिन करोना विषाणूमुळे निर्माण केलेल्या भयानक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडले तर त्याचे कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात, याची प्रचिती आल्याने मानवी समाज धास्तावलेला आहे. स्टॉकहोम येथे १९७२ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी परिषदेत बिघडत चाल‌लेल्या पर्यावरणाच्या स्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि त्यावेळी पर्यावरणविषयक जागृती करण्याच्या हेतूने पर्यावरण दिन साजरा करण्याचे निश्चित झाले. १९७४ सालापासून जगातल्या विविध देशांत पर्यावरण दिन साजरा होऊ लाग‌ला. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन हा दिवस साजरा होत असून, ‘यंदा साजरी करू‌या जैवविविधता’ ही संकल्पना अधोरेखित करण्यात आलेली आहे. आज मानवी समाजाने आपल्या विकासाचा रथ पुढे नेताना, पर्यावरणीय मूल्यांकडे दुर्लक्ष करण्यात रस घेतलेला आहे. ब्राझील सारख्या जैवविविधतेची गर्भश्रीमंती अनुभवणाऱ्या देशात सोयाबिन आणि नगदी पिकांच्या शेती, बागायतीला प्राधान्य देण्यासाठी विश्वाची फुफ्फुसे गणल्या जाणाऱ्या सदाहरित जंगलांचे वैभव काडीमोलाने नष्ट केले जात आहे. जगातले पाणी आणि प्राणवायू यांच्या निर्मितीचे कोठार गणले जाणारे अॅमेझोन न‌दी खोऱ्यातले जंगल राखण्याचा ठेका केवळ आपणाला देणे अयोग्य, अशी भूमिका घेऊन इथले सत्ताधीश जंगलांच्या तोडीला मुभा देत आहेत आणि त्यामुळे इथली जैवविविधता धोक्यात आलेली आहे. 

जेथे सुशिक्षित आणि साक्षरतेचे लक्षणीय प्रमाण आहे, त्या केरळमध्ये वायनाड जिल्ह्यातल्या महल्लापूरम येथील आततायी लोकांनी स्फोटकांनी युक्त अननस गर्भवती हत्तीणीला खायला घालून, तिला जायबंदी केली. त्यामुळे अन्न सेवन करणे दुरापास्त झाल्याने त्या हत्तीणीला केविलवाणा मृत्यू पाण्यात आला. हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष केरळमध्ये विकोपाला पोहचलेला आहे आणि त्यात हत्तीचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. २००३ सालापासून गोवा सरकार आणि वन खात्याने इथे पट्टेरी वाघाचे वास्तव्य नसल्याचा पाढा वाचून, बेकायदेशीररित्या लोह, मॅंगनिजसारख्या खनिजांच्या उत्खननाला प्राधान्य दिले. इथल्या जंगलांना उद्ध्वस्त करण्याचे सत्र चालूच ठेवले आणि त्याद्वारे वाघ, बिबटे, अस्वल यांच्या अस्तित्वाला बेदखल केले. त्यामुळे २००९ मध्ये केरी - सत्तरीत एका वाघाच्या क्रूररित्या केलेल्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. परंतु त्यानंतर इथल्या वाघांचा नैसर्गिक अधिवास त्याचप्रमाणे त्यांना लागणाऱ्या अन्न-पाण्याच्या उपलब्धते संदर्भात आणि वन व्यवस्थाप‌नाबाबत नियोजनबद्ध उपाययोजना न केल्याने, जाने‌वारी २०२० मध्ये म्हादई अभयारण्याच्या शेजारी असलेल्या गोळावलीत चार वाघांची विषप्रयोगाद्वारे हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. गोव्यात एक वाघिण, तिचे दोन बछडे आणि प्रौढत्वाच्या मार्गावरचा वाघ यांची जहाल विषप्रयोगाने केलेली हत्या, आपल्या राज्यात जैवविविधतेला किती महत्त्व आणि आदर दिला जातो, हे स्पष्ट करते.

दक्षिण गोव्यात जुवारी आणि अरबी सागराच्या पाण्याच्या संगमस्थळी असलेली चिखलीची किनारपट्टी कवचधारी माश्यांसाठी प्रसिध्द आहे. इथल्या विन्डो ऑयस्टरचा विनियोग कधीकाळी खिडक्यांची तावदाने सजवण्यासाठी केला जायचा. आज चिखली येथे जैविक संपदेचे वैशिष्ट्यपूर्ण जे घटक आहेत, त्यांची अक्षरशः लयलूट चालू आहे. ज्या ताळगावच्या चवदार वांग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा लौकिक आगशीसारखाच सर्वदूर पसरले‌ला आहे, तेथे उभी होणारी सिमेंट काँक्रिटची बांधकामे हा वारसा संकटांच्या खाईत लोटत आहे. देश - विदेशातल्या पक्ष्यांसाठी आकर्षण ठरलेले करमळीचे तळे, रेल्वे मार्ग आणि या परिसरातल्या लोकमानसाच्या आततायी कृत्यांमुळे घातक वनस्पतींच्या अच्छादनांची शिकार ठरलेले आहे. चोडणसारख्या बेटावरचे खारफुरीचे सुरक्षा कवच संकटग्रस्त आहे. सागर किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या मारवेलीची दखल कोणी घेत नाही. ऑलिव्ह रिडली कासवाच्या प्रजातीचा मोरजी, गालजीबाग, आगोंद येथे संघर्ष सुरू आहे. ट्रॉलरद्वारे मासेमारी करणारे समुद्री साप, कासव आणि अन्य जलचरांची काळजी घेत आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे.

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणामार्फत प्रत्येक राज्यात जैवविविधता मंडळे कार्यरत आहेत. गोव्यात या मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमुकादम यांनी प्रत्येक पंचायतीत जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना होऊन सार्वजनिक जैवविविधता नोंदवही लोकसहभागातून कार्यरत होण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे. मंडळातर्फे डिचोली तालुक्यातील सुर्ल या खाणग्रस्त गावात राज्यातले पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून तेथील बाराजणांची देवराई अधिसूचित करण्यात आलेली आहे. राज्यातल्या देवराईच्या परंपरेची माहिती देणारे सचित्र पुस्तक, व्यापारयोग्य जैव साधनसंपत्तीच्या समस्त घट‌कांविषयी ज्ञानवारसा मूर्त स्वरुपात आणणारा ग्रंथ, जैवविविधतेच्या पैलूंविषयीचे माहितीपट... यासारख्या प्रयत्नांमुळे एका छोटेखानी राज्याचे नैसर्गिक वैभव प्रकाशात आलेले आहे. असंख्य प‌शुपक्षी आणि वनस्पतीच्या जगण्याला आधार ठरलेल्या तळ्यांचा राज्यस्तरीय पाणथळीच्या स्थळांत समाविष्ट करण्याच्या प्रयत्नाने स्थानिक लोकांना त्यांच्या संरक्षणासाठी प्रवृत्त केलेले आहे.

गोव्यात जी सहा अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे, त्यातल्या जैविक संपदेची श्रीमंती अधोरेखित करण्याच्या प्रयत्नांना राजाश्रयाबरोबर उत्स्फूर्तरित्या स्थानिक लोकसहभाग लाभ‌ला तर नैसर्गिक सौदर्य आणि श्रीमंतीसाठी ख्यात असलेले गोवा, देश-विदेशातील जनतेसाठी आकर्षण बिंदू ठरेल. त्यासाठी जंगली श्वापदांना कृत्रिम पेयजलाची व्यवस्था, अन्नाची रसद पुरवणाऱ्या फळाफुलांच्या वृक्षवेलींची पैदासी, देवराया आणि देवतळ्या यांचे संरक्षण, सेंद्रिय खताच्या वापरावर शेती आणि बागायतीची परंपरा वृद्धिंगत करणे, शालेय वि‌द्यार्थी आणि तरुणाईच्या सह‌भागातून वृक्षारोपण आणि अस्तित्वात असलेल्या वृक्षवेलींचे पालकत्व स्वीकारून संगोपन, धार्मिक संस्थांच्या सहभागातून वनौषधी उपवन, नक्षत्र वन, मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ स्मृती वृक्षारोपण... आदी उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. जैवविविध‌तेचा वारसा आणि महत्त्व अभिवृद्ध करण्यासाठी त्याविष‌याचा अंतर्भाव शैक्षणिक स्तरावर करून लोकजागृतीला वाव देणे महत्त्वाचे आहे. 'वृक्षवेली आम्हा सोयरी' असे सांगणारी आपली संस्कृती समृद्ध करण्यासाठी सध्या नियोजनबध्द आणि प्रामाणिक प्रयत्नांची सर्व स्तरावर गरज आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५