दोन दलाई लामांची निवड शक्य

चीन स्वतःचा एक ‘दलाई लामा’ नेमण्याचा विचार करत आहे, जो त्याच्या राजकीय धोरणाला पोषक ठरेल. मात्र, विद्यमान दलाई लामा यांनी वारंवार सांगितले आहे की, चीन सरकारने निवडलेला दलाई लामा त्यांना मान्य नसेल.

Story: संपादकीय |
06th July, 09:15 pm
दोन दलाई लामांची निवड शक्य

दलाई लामा हे तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वोच्च आध्यात्मिक गुरू आहेत तसेच ते जागतिक स्तरावर शांततेचे, अहिंसेचे आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. परंपरेनुसार, दलाई लामा हे अवलोकितेश्वर या करुणेच्या बोधिसत्त्वाचे पुनर्जन्म मानले जातात. अनेक शतकांपासून तिबेटी बौद्ध परंपरेनुसार, एका दलाई लामाच्या निधनानंतर त्यांचा पुढील जन्म झालेला मुलगा शोधून काढण्याची प्रक्रिया पार पडते. मात्र, आता ही परंपरा चीन सरकारच्या हस्तक्षेपामुळे तसेच अनेक राजकीय आणि सामाजिक अडचणींमुळे धोक्यात आली आहे. सध्या १४ वे दलाई लामा वयस्कर झाले आहेत, त्यामुळे नव्या दलाई लामाची निवड हा एक जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. तिबेटी बौद्ध धर्मानुसार, दलाई लामा मृत्यूनंतर पुनर्जन्म घेतो. त्यांचा नव्याने जन्म झालेला बालक शोधण्यासाठी ज्येष्ठ भिक्षू आणि धार्मिक अधिकारी एकत्र येतात. त्यासाठी स्वप्ने, दृष्टांत, धार्मिक संकेत आणि निसर्गातील चिन्हांचा अभ्यास केला जातो. जेव्हा असा एक संभाव्य बालक सापडतो, तेव्हा त्याची चाचणी घेतली जाते. या चाचणीत त्याला मागील दलाई लामाचे खासगी साहित्य ओळखण्यास सांगितले जाते. योग्य चाचणीनंतर त्याला अधिकृतपणे दलाई लामा म्हणून मान्यता दिली जाते आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले जाते. ही प्रक्रिया केवळ धार्मिक नसून तिबेटी संस्कृती व ओळखीच्या सातत्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, आता यात राजकीय हस्तक्षेप होताना दिसतो आहे. चीनने दावा केला आहे की त्यांनाच सर्व तिबेटी धार्मिक गुरूंच्या पुनर्जन्मास मान्यता देण्याचा अधिकार आहे. त्यांनी ‘गोल्डन अर्न’ या ऐतिहासिक प्रथेस दुजोरा देत असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, चीन स्वतःचा एक ‘दलाई लामा’ नेमण्याचा विचार करत आहे, जो त्यांच्या राजकीय धोरणाला पोषक ठरेल. मात्र, विद्यमान दलाई लामा यांनी वारंवार सांगितले आहे की चीन सरकारने निवडलेला दलाई लामा त्यांना मान्य नसेल, कारण तो बेकायदेशीर असेल. आपला उत्तराधिकारी चीनबाहेर म्हणजे स्वतः निर्वासित स्थितीत असलेल्या भारतात अथवा दुसऱ्या देशातील असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

चीन व दलाई लामांच्या या भूमिकेमुळे भविष्यात दोन वेगवेगळ्या दलाई लामांची शक्यता निर्माण झाली आहे. एक तिबेटी निर्वासित सरकार आणि बौद्ध अनुयायांनी मान्य केलेला आणि दुसरा चीन सरकारकडून नेमलेला. याच कारणास्तव पारंपरिक प्रक्रिया केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही धोक्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ भिक्षू वृद्ध झाले आहेत किंवा निवर्तले आहेत, तर निर्वासित तिबेटी समाज जगभर विखुरलेला आहे. त्यामुळे नव्या दलाई लामाचा शोध ही प्रक्रिया अधिक कठीण झाली आहे. दलाई लामा हे केवळ धार्मिक गुरू नसून, तिबेटी संस्कृती, स्वातंत्र्य आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडीचा प्रश्न हा केवळ आध्यात्मिक नाही, तर तिबेटी लोकांच्या भविष्याशी संबंधित राजकीय संघर्ष बनला आहे. दलाई लामाचा पुनर्जन्म भारतात किंवा चीनबाहेर झाला असेल तर ती व्यक्ती निर्वासित तिबेटी समाजात मान्यता पावेल, पण चीन त्याला संमती देणार नाही, हे स्पष्ट दिसते आहे. चीनने स्वतःचा दलाई लामा नेमल्यास ही निवड जागतिक बौद्ध समाजात मान्य नसणार, हे तर उघड आहे. धार्मिक नेतृत्वाची जागा लोकशाही तत्त्वांनुसार चालणाऱ्या संस्था घेतात, हा तिबेटी समाजातील एक विचारप्रवाह आहे. दलाई लामा निवडीची परंपरा जपण्यासाठी तिबेटी बौद्ध समाज, जागतिक समुदाय आणि मानवाधिकार संस्थांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.

दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न हा तिबेटी लोकांच्या अस्तित्वाशी, त्यांच्या संस्कृतीच्या टिकावावर आणि धार्मिक स्वातंत्र्याशी निगडित आहे. त्यामुळे पुढील दलाई लामाची निवड केवळ बौद्ध धर्मापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती जगभरातील लक्ष वेधून घेणारी ऐतिहासिक घटना ठरेल. विद्यमान दलाई लामांच्या पाठीशी भारत सरकार उभे राहणार असून, त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकाऱ्याची निवड योग्य ठरेल, असे सरकारने स्पष्ट केले असले तरी कोणत्याही धार्मिक वादात सरकार पडणार नाही अशी स्पष्ट भूमिका सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. गेडन फोड्रांग ट्रस्ट ही भारतातील विश्वस्त संस्था आपल्या सूचनेनुसार नव्या दलाई लामाचा शोध घेईल, असे विद्यमान दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांनी पुन्हा स्पष्ट केल्यामुळे दोन व्यक्ती दलाई लामा म्हणून पुढे येण्याची शक्यता वाढली आहे.