भा रत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने इंग्लंडचा ३३६ धावांनी दणदणीत पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे हा विजय भारताचा बर्मिंगहॅमच्या मैदानावरील पहिला कसोटी विजय ठरला. या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती युवा कर्णधार शुभमन गिल याने. ज्याने नेतृत्व आणि फलंदाजी दोन्हीतून अविस्मरणीय योगदान दिले.
मालिकेतील लीड्सवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात चार भारतीय फलंदाजांनी मिळून पाच शतके झळकावली. पण, तरीसुद्धा अंतिम दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडने ३७१ धावांचे आव्हान पूर्ण करत भारताला पराभूत केले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलसमोर मोठे आव्हान होते. त्यातही भारताला या मैदानावर पूर्वी कधीच विजय मिळवता आलेला नव्हता आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुपस्थित होता. दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्याच डावात ५८७ धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभा केला. कर्णधार गिलने २६९ धावांची ऐतिहासिक खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. भारताकडून सिराजने ६ तर आकाशदीपने ४ बळी घेतला. त्यामुळे भारताला १८० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने जलद धावा करत ४२७ धावांवर डाव घोषित केला. यावेळीही गिलने १६१ धावांची खेळी करत दुसरे शतक झळकावले.
शुभमन गिलचा कर्णधार म्हणून हा केवळ दुसरा कसोटी सामना होता आणि दुसऱ्याच सामन्यात त्याने इतिहास घडवला. याआधी बर्मिंगहॅमच्या एडगबास्टन मैदानावर भारतीय संघ ८ कसोटी सामने खेळला होता. त्यात भारताला ७ पराभव पत्करावे लागले होते, तर केवळ १ सामना अनिर्णित राहिला होता. मात्र गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पहिला कसोटी विजय येथे नोंदवला, तोही ३३६ धावांनी!
तो एकाच कसोटीत एक द्विशतक व एक शतक झळकावणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला. कसोटीच्या इतिहासात एकाच कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे, तसेच इंग्लंडमध्ये कसोटी विजय मिळवणारा भारताचा सर्वांत युवा कर्णधार (२५ वर्षे ३०१ दिवस) ठरला.
या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. उर्वरित ३ कसोटी सामने अजून बाकी असून त्यात गिलकडून अजून उत्तम नेतृत्वाची आणि फलंदाजीची अपेक्षा आहे. पुढील सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर १० जुलैपासून होणार आहे. गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवून केवळ एक सामना नाही, तर एक नवा आत्मविश्वास मिळवला आहे, जो आगामी कसोटी मालिकांसाठी निर्णायक ठरेल.
-प्रवीण साठे, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत