बुडत्या बंधूंना आता 'हिंदी'चा आधार?

केंद्र सरकारला आता काही पावले उचलावी लागतील. 'हिंदी' काडीचा आधार घेत बुडत्या ठाकरे बंधूंचे मिलन तर एकदाचे झाले आहे, त्यांचे मनोमिलन होण्याची आता सर्वांना प्रतीक्षा आहे.

Story: विचारचक्र |
15 hours ago
बुडत्या बंधूंना आता 'हिंदी'चा आधार?

बा ळासाहेब ठाकरे यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आणि आम्ही दोघे बंधू एकत्र आलो, असे राज ठाकरे आपल्या ठेवणीतल्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांना मिठी मारल्यानंतर म्हणाले आणि त्यांना जोरदार टाळ्याही मिळाल्या. राज ठाकरे यांना आतापर्यंत टाळ्यांची कधीच कमतरता भासली नाही, पण त्या टाळ्यांचे मतांमध्ये कधी रूपांतर झाले नाही किंवा यापुढेही ते होईलच असे सांगता येणार नाही. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र उभे राहिले असले तरी या दोघांसाठी ती एक राजकीय गरज होती आणि ती गरज लक्षात घेऊनच त्यांनी हा तमाशा घडवून आणला, यापलीकडे जाऊन या घटनेकडे कोणी पाहण्याची गरज आहे, असे म्हणता येणार नाही. बुडत्याला काडीचा आधार अशी जुनी म्हण प्रचलित आहे, त्याच धर्तीवर या दोघांचा वाजतगाजत एकत्र येण्याचा निर्णय म्हणजे बुडत्या ठाकरे बंधूंना 'हिंदी'चा आधार, असे म्हणता येईल. आता याच 'काडी'चा आधार घेत ठाकरे बंधूंना सध्याच्या जोरदार राजकीय प्रवाहात उलट्या दिशेने पोहत जाऊन पैलतीर गाठायचा आहे आणि ते त्यांना कितपत शक्य होईल याची आज तरी सगळ्यांनाच शंका आहे. राज ठाकरे यांच्या या टाळ्या मिळवणाऱ्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया तशी बरीच बोलकी आहे. त्यांना एकत्र आणण्याचे श्रेय ते मला देत असतील तर बाळासाहेब जेथे कुठे असतील तेथून ते मलाच आशीर्वाद देतील, असे फडणवीस म्हणाले. केवळ मराठीच्या नावाखाली दांभिकपणाचे हे जे नाटक घडवून आणले आहे, ते लोकांना कितपत रुचले आहे, हा प्रश्न यासंदर्भात अधिक महत्त्वाचा आहे.

राजकारणात काहीही अशक्य नाही हेच उद्धव आणि राज ठाकरे यांनी तब्बल दोन दशकांनंतर त्यांच्यातील राजकीय वैर संपवून एकमेकांना मिठी मारून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे असो अथवा राज, आजच्या परिस्थितीत त्यांचे राजकीय वजन इतक्या उतरणीला लागले आहे की, त्यांच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सल्लागारांनी त्यांना एकत्र येण्याचा सल्ला द्यावा आणि तो शिरोधार्य मानून दोघांनीही अगदी तातडीने गळाभेट करावी, हे सगळे तसे पचायला कठीण असले तरी कोणतीही किंमत मोजून आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणे याचसाठी हा सगळा अट्टाहास होता, हे लपून रहात नाही. मराठी भाषेच्या हिताच्या नावाखाली आम्ही पुन्हा टाळी दिली असल्याचा भास निर्माण करून अवघ्या महाराष्ट्राने आम्हाला डोक्यावर घ्यावे असेच काहीसे उद्धव आणि राज यांना अभिप्रेत असले तरी त्यांना अजून बऱ्याच कसोट्यांवर ते सिद्ध करावे लागणार आहे आणि त्यांचा पुढचा मार्गही त्यांना आज वाटतो तेवढा सोपा निश्चितच नाही. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील तब्बल दोन दशकांचे राजकीय वैर उभा महाराष्ट्रच नव्हे तर तर पुरता देश जाणून आहे. मागील काही निवडणुकांमध्ये या दोघांनी एकमेकांविरुद्ध गरळ ओकून आपलेच प्यादे कसे श्रेष्ठ आहे, हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला तोही जनतेसमोर आहे. अशावेळी मराठीच्या हिताच्या नावाखाली हिंदीच्या काडीचा आधार घेत राजकीय स्वार्थासाठीच ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, हा जो समज लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे तो समज दूर करण्याचे खूप मोठे काम उद्धव आणि राज या दोघांनाही करावे लागेल.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्रीकरणाची ही संहिता लिहिली, यात कोणताही संदेह नाही. विजय मेळाव्यात तर दोघांनीही आपापल्या भाषणातून महानगरपालिका आणि राज्यातही सत्ता हस्तगत करू, असे संकेत दिले. पण तसे वक्तव्य करण्याआधी आपण आज नेमके कुठे चाचपडत आहोत, भान ठेवले असते तर कदाचित त्यांनी एवढी झेप घेण्याचे धाडस केले नसते. हिंदीच्या सक्तीचा खोटा बागुलबुवा उभा करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना भडकावणे, हाच ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधून घेऊ असे जर त्यांना वाटत असेल तर मात्र त्यात त्यांना कितपत यश मिळेल, याची शंकाच आहे. मायमराठीला न्याय देण्यात गेली अनेक वर्षे आपण कसे मागे पडलो, याचा विचार आधी केला असता तर आजचा हा ढोंगीपणा चव्हाट्यावर आला नसता. दोघाही बंधूंनी आपले दीर्घ काळाचे वैर संपवून एकत्र येण्यास तसा कोणाचाच विरोध नव्हता. कौटुंबिक नाते जपण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हे मिलन आधी घडवून आणले असते तर कदाचित पुरता महाराष्ट्र उद्धव आणि राज यांच्यामागे राहिलेला दिसला असता, पण तसे झाले नाही.

राजकीय स्वार्थासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, याची राजरोस कबुलीही अप्रत्यक्षरित्या शनिवारच्या मेळाव्यात दोघांनी दिली आणि हा ढोंगीपणा लोकांना आवडेल असे त्यांना वाटत असेल तर तो भ्रम त्यांनी आधी दूर करावा. लोकही आता बरेच समजूतदार असून त्यांना गृहीत धरूनच हा ढोंगीपणा केला असेल, तर ती खूप मोठी चूक ठरेल. ठाकरे बंधूंनी मराठीच्या हितासाठी आपण एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण करून हिंदी भाषा सक्तीची केली जाणार असल्याचा माहोल तयार केला. हिंदीच्या सक्तीची खोटी भीती दाखवून त्या आधारे एकत्रीकरणाचे नाटक रंगवले गेले. आता या मंडळीचा नेमका अजेंडा काय होता याचीही भांडाफोड झाली, हे बरे झाले. राज्य सरकारने जे निर्णय घेतले ते जाणून घेतल्यास हिंदी सक्तीच्या नावाखाली भूई धोपटणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार त्रिभाषा सूत्राला अनुसरून पहिलीपासून तिसरीपर्यंत हिंदीचा केवळ मौखिक अभ्यास निर्धारित करण्यात आल्याचे सांगण्यात येत असेल तर त्यास विरोध करण्याचे कारण काय आणि अखेर तेही निर्णय स्थगित केल्यानंतर विजय मेळावा आयोजित करणे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत एकत्र येण्याचा अजेंडा पुढे नेण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे अन्य पर्याय नव्हता वा पुढे कदाचित अशी संधी मिळेलच याची त्यांना खात्री नसावी. अखेर हिंदी हीच देशाची एकमेव संपर्क भाषा होऊ शकते हे मान्य असेल तर त्यास असा विरोध करणे कितपत योग्य आहे, याचाही विचार करावा लागेल. इंग्रजीच्या वाढत्या वर्चस्वावर आपण तोंड फाटेपर्यंत बोलतो मग हिंदीविरोधात हा पवित्रा का, याचे उत्तर मिळत नाही. हिंदीची सक्ती केली जात नसेल तोपर्यंत निदान अशा गोष्टी टाळायला हव्यात. हिंदीची सक्ती केली जात आहे, हा होणारा दुष्प्रचार रोखण्यासाठीही केंद्र सरकारला आता काही पावले उचलावी लागतील. 'हिंदी' काडीचा आधार घेत बुडत्या ठाकरे बंधूंचे मिलन तर एकदाचे झाले आहे, त्यांचे मनोमिलन होण्याची आता सर्वांना प्रतीक्षा आहे.



- वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९