लंकेतील सीता मंदिराची होणार शरयूच्या जलाद्वारे प्रतिष्ठापना

Story: विश्वरंग |
30th April, 10:24 pm
लंकेतील सीता मंदिराची होणार शरयूच्या जलाद्वारे प्रतिष्ठापना

भारतात अयोध्येमध्ये रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता श्रीलंकेत माता सीतेचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. येथे सीतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येतील शरयू नदीच्या जलाद्वारे केली जाणार आहे. श्रीलंकेतील सीता अम्मन मंदिर प्रशासनाने यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून मंदिरासाठी शरयू नदीचे पाणी मिळावे, अशी विनंती करणारे पत्रही पाठवले आहे. त्यांच्या विनंतीला मंजुरीही देण्यात आली आहे.

रामायणात ज्या अशोक वाटिकेची चर्चा आहे, त्याचे पुरावे श्रीलंकेत सापडले आहेत. श्रीलंका हे हिंद महासागराच्या उत्तरेला स्थित एक बेट आहे. ते भारतापासून फक्त ३१ किलोमीटर अंतरावर आहे. देशाच्या नुवारा एलिया प्रदेशातील डोंगरावर एक पवित्र स्थान देखील आहे. तिथे माता सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. या टेकड्यांवर हनुमानाच्या पावलांचे ठसेही पाहायला मिळतात आणि या ठिकाणी रिंगणोत्सवही साजरा केला जातो.

तामिळ लोक श्रीलंकेच्या या भागात पोंगल महिन्यात उत्साहाने साजरे करण्यासाठी येतात. असे मानले जाते की, भगवान हनुमानाने अशोक वाटिकेतच श्री रामाची अंगठी माता सीतेला दिली होती आणि त्या आधारावर येथे उत्सव साजरा केला जातो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक संबंध मजबूत होण्यामागेही हेच कारण आहे. त्यामुळे माता सीतेचे मंदिर बांधण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मध्य प्रदेश सरकार अनेक वर्षांपासून श्रीलंकेत सीता मंदिर बांधण्याचा विचार करत होते. परंतु, हा मुद्दा २०१६ पासून सुप्तच आहे. श्रीलंका सरकारने हे मंदिर बांधण्यास सहमती दिल्यास देशातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असे तत्कालीन मध्यप्रदेशच्या सरकारने म्हटले होते. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.

श्रीलंकेतील मंदिर प्रशासनाचे एक पथक आता १५ मे रोजी जल घेण्यासाठी भारतात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी २१ लिटर शरयू जल उपलब्ध करून देण्याचे निर्देश अयोध्या तीर्थ विकास परिषदेला दिले आहेत. ही प्रक्रिया १९ मे रोजी होणार असून मंदिराच्या इतिहासात ही एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

सीता अम्मन मंदिराच्या प्रतिनिधी मंडळाच्या इच्छेनुसार, शरयूचे पाणी अगोदर रामललाच्या दरबारात ठेवले जाणार आहे. रामललांचा जन्म तर शरयू नदीच्या किनारीच झाला आहे. माता शरयू अगोदर आली व प्रभू श्रीरामांचा जन्म नंतर झाला आहे. प्रभू रामाच्या जन्माच्या अगोदरपासून माता शरयू अयोध्येत विराजमान आहे. आता शरयूचे हे जल दोन देशांतील लोकांच्या मनात सेतू जोडण्याचे काम करेल, हे मात्र निश्चित.


- संतोष गरुड, गोवन वार्ता