बहुआयामी साहित्यिक मोहन कुलकर्णी

शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थ्यांच्या पिढ्या सुसंस्कारित करण्यासाठी धडपडणारे अध्यापक असतात. सत्तरीतील होंडा येथील नारायणनगर येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ साहित्यिक मोहनराव कुलकर्णी हे सतत नाविन्याची ओढ असणारे आणि सकल साहित्याची मेजवानी आपल्या वाचक वर्गाला देणारे व्यक्तिमत्व होते.

Story: विचारचक्र |
30th April, 10:26 pm
बहुआयामी साहित्यिक मोहन कुलकर्णी

आयुष्याच्या अंतापर्यंत साहित्य विश्वाची अखंड सेवा करण्यात जीवनानंद अनुभवणारी खूप कमी व्यक्तिमत्वे असतात. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी कमवण्याच्या नादात बरीच मंडळी सातत्याने आपल्या जीवनाचा आनंद हरवून बसतात. परंतु काही माणसे विविध भाषांतील उत्तम साहित्यकृती वाचकांसमोर आणण्यासाठी अपरिमित धडपडतात आणि ते साहित्य पदरमोड करून प्रकाशित करण्यापायी खस्ता खातात. शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थ्यांच्या पिढ्या सुसंस्कारित करण्यासाठी धडपडणारे अध्यापक असतात. सत्तरीतील होंडा येथील नारायणनगर येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ साहित्यिक मोहनराव कुलकर्णी हे सतत नाविन्याची ओढ असणारे आणि सकल साहित्याची मेजवानी आपल्या वाचक वर्गाला देणारे व्यक्तिमत्व होते. जीवनातला तीन तपांहून अधिक कालखंड शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून व्यतित केल्यावर निवृत्तीनंतरचा कालखंड मुले, नातवंडे यांचे लाड पुरवण्याबरोबर ऐषआराम करण्याऐवजी या माणसाने सातत्याने नवनवीन साहित्यकृतींची निर्मिती करण्याचा ध्यास घेतला होता. सेवानिवृत्तीनंतरचा प्रत्येक दिवस साहित्याचे वाचन, मनन, चिंतन आणि लेखनात घालवण्यात त्यांनी आपले सुख समाधान मानले.

सेवानिवृत्ती होताना माणसे आपल्या पैशांची गुंतवणूक फायदेशीर उपक्रमांत करतात आणि त्यातून ऐषआरामी जीवन जगण्यात धन्यता मानतात. परंतु कुलकर्णी सरांनी पदरमोड करून नवनवीन साहित्यिकांच्या कविता, ललित लेख आणि विविध साहित्य प्रकाराला प्रकाशित करण्यासाठी स्वखर्चाने त्रैमासिक, विशेषांक, दिवाळी अंकांची निर्मिती केली. विशेषांक म्हटल्यावर बरीच मंडळी त्यात जास्तीत जास्त जाहिरातींचा भरणा करून, आपणास चांगली आर्थिक कमाई होईल, याकडे विशेष लक्ष देतात आणि नाममात्र साहित्याला अंकात जागा देतात. परंतु कुलकर्णी सरांनी विशेषांकाच्या निर्मितीसाठी जाहिराती मिळो किंवा न मिळो, पण आपल्या अंकात जास्तीत जास्त साहित्य कसे प्रकाशित होईल, याकडे लक्ष दिले. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या उत्तम साहित्यकृतींचा अनुवाद करून त्यांनी त्यांचे प्रकाशन आपल्या अंकात करून, वाचकांना अमूर्त साहित्याचा खजिना विमुक्तपणे खुला करून दिला. जगभरातल्या उत्तम साहित्यकृतींचे त्यांनी सातत्याने वाचन करण्यात आणि आपणाला भावलेल्या साहित्यकृतींचा अनुवाद वाचकांना देण्याचा प्रयत्न हे त्यांनी जणुकाही आपल्या जीवनातले प्रमुख व्रत मानले होते.

मराठी आणि हिंदी या दोन्ही हो भाषांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या असताना आणि सेवानिवृत्त झाल्यावर ज्ञानोपासना थांबवण्याऐवजी त्यांनी अखंडपणे ती चालू ठेवली. स्वखर्चाने पुस्तके विकत घेऊन त्यांचे वाचन करून, त्यातल्या संस्कृत, हिंदी, कोकणी, इंग्रजी आदी भाषांतील साहित्याचा अनुवाद करून ते स्वखर्चाने प्रकाशित करणारे प्रकाशक आज दुर्मिळ झालेले आहेत. परंतु कुलकर्णी सर हे त्याला अपवाद होते. अनुवादक, भाषांतरकार, कवी, लेखक, प्रकाशक म्हणून त्यांनी काम करून गोमंतकीय साहित्य विश्वात आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाचा ठसा यशस्वीपणे उमटवला होता. कविता, निबंध, कथा, ललित लिखाण आदी साहित्याचे विविध प्रकार हाताळताना त्यांनी उंबर फुले, रंग संसाराचे, तरंग मनाचे, रंग जीवनाचे आदी पुस्तकांची निर्मिती करून मराठी भाषा आणि साहित्याच्या गोमंतकीय क्षेत्रात योगदान दिलेले आहे. १९४८ साली बेळगावात जन्माला आलेल्या कुलकर्णी सरांनी गोव्यात शिक्षकी पेशा स्वीकारून, हा प्रदेश आपली कर्मभूमी मानली आणि इथल्या भाषा, संस्कृतीचा विलक्षण व्यासंग धरून त्यांची सेवा निरंतरपणे करणे आपल्या जगण्याचा धर्म मानला. 

हिंदी, उर्दू, अरेबिक, इंग्रजी, कोकणी, मराठी, तेलगू, कन्नड, बंगाली आदी भाषांतील साहित्य वाचन करून, त्याचा अनुवाद वाचकांसाठी उपलब्ध करून दिला. कविकुलगुरू कालिदासांचे मेघदूत काव्य ही अजरामर साहित्यकृती संस्कृत भाषेत असून तिचा अनुवाद मराठीतील बऱ्याच लेखकांनी केलेला असला तरी अगदी सोप्या भाषेत अनुवाद करून कुलकर्णी सरांनी वाचकांना ते उपलब्ध केलेले आहे. शारदियेची चंद्रकळा, साहित्य नंदनवन नावांनी विशेषांक प्रसिद्ध करून त्यांनी सर्वसामान्य वाचक वर्गाला अपरिचित अशा साहित्यकृतींचा अनुवाद उपलब्ध करून वाचन सुख प्रदान केले आहे. ही त्यांची सेवा लक्षणीय अशीच आहे.

वयाची ऐशी वर्षे ओलांडलेली असताना आणि शरीर वार्धक्याने गलितगात्र झालेले असताना त्यांचा साहित्य निर्मितीचा ध्यास मात्र अखंडपणे चालू राहिला. आपले त्रैमासिक प्रकाशित झाले पाहिजे आणि ते करताना आर्थिक नुकसानी झाली तरी बेहत्तर, अशी त्यांची धारणा झाली होती. त्यामुळे त्यांनी मुगल सम्राट असणाऱ्या बहादूरशहा जफर या राजकर्त्याने ज्या गझल लिहिल्या होत्या, त्यावर गझल विशेषांक प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी बहादूरशहा जफर, इब्राहिम औक, ख्वाजा पीर मुहम्मद, मोमीन, मीर, बेगम अख्तर सिद्दिकी, नवाब बेगम आणि शायरांच्या गझल प्रकाशित करण्याबरोबर मराठी, कोकणी, संस्कृत भाषेतील गझलांचा वाचकांना आनंद प्रदान केला होता. तत्पूर्वी त्यांनी मराठी भाषेत एकापेक्षा एक सुरस, सुंदर गझलांची निर्मिती करणाऱ्या सुरेश भटांवर विशेषांक प्रकाशित केला होता. शायर आझम गालिब यांच्यावरही त्यांनी विशेषांक प्रकाशित केला होता. भारतीय साहित्याबरोबर जागतिक साहित्याचा अनुभव त्यांनी विदेशी लेखक, कवी यांच्या साहित्यकृतींचा अनुवाद करून वेळोवेळी वाचकांना देण्याचा प्रयत्न केलेला होता. 

व्याधी, वार्धक्याने शरीर पूर्णपणे थकलेले असताना, त्यांची जिद्द आणि उत्साह कमी झाला नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर गेले काही दिवस मृत्यू नाचत असताना त्यांची जगण्यावरची आणि साहित्यवरची श्रद्धा अखंड होती आणि त्यामुळे शरीर थरथरत असताना आणि वेदनेने ते गलितगात्र झालेले असताना देखील हे व्यक्तिमत्व तसूभरही निरुत्साही होऊन थांबले नाही. आपला जन्म उत्तम साहित्याचा अन्य भाषेत अनुवाद करण्यासाठी आहे, अशी त्यांची धारणा झाली होती आणि त्या कार्यात परमानंद अनुभवत असताना त्यांनी पंचत्वात विलीन होण्यात धन्यता मानली. त्यांच्या भाषा आणि संस्कृतीच्या त्याचप्रमाणे एकंदर साहित्य क्षेत्रातल्या कार्याची दखल घेऊन त्याना भा. ल. भांडारे, माणिक पुरस्कार, बिल्वदल पुरस्कार, कला आणि संस्कृती खात्याचा पुरस्कार आदी मानसन्मान लाभले होते. परंतु पुरस्कारांनी हुरळून न जाता त्यांनी साहित्याची सेवा अविरतपणे चालू ठेवण्यात धन्यता मानली होती, ही बाब गोमंतकीयांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५