वेळुस, म्हादई नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे जलसिंचन योजनावर परिणाम.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th April, 02:45 pm
वेळुस, म्हादई नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे जलसिंचन योजनावर परिणाम.

वाळपई : सत्तरीतील वेळुस आणि म्हादई या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. याचा विपरीत परिणाम जलसिंचन खात्याच्या विविध योजनांवर होता आहे. अनेक ठिकाणी बाग-बागायती, वायंगण शेतीसाठी जलसिंचन करण्यात अडथळा येत असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. जलसिंचन खात्याचे कर्मचारी सर्वांना पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा  यासाठी कार्यरत आहेत. 

जलसिंचन खात्याकडून वाळवंटी, रगाडा-वेळुस, म्हादई या नद्यांच्या परिसरात अनेक उपसा योजना राबवल्या आहेत, तसेच तिन्ही नद्यांवर बंधारे बांधत शेती बागायतीत पाणी वळवण्यात आले आहे. विविध योजना राबवल्यामुळे सत्तरीतील लाखो चौरस मीटर जमीन ओलिताखाली आली आहे. जलसिंचन खात्याने बंधारा योजना राबविण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी पडीक असलेल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लागवडी सुरू झाल्या. दरम्यान उन्हाळ्याचा प्रकोप पाहता अनेक ठिकाणी पाण्याचे साठे आटत असल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक स्वरूपाच्या उपायोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सध्या असलेल्या बंधाऱ्याना जोडूनच अतिरिक्त बंधाऱ्यांची उभारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाल्यास पावसाळा संपल्यानंतर पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याचे अनुकूल परिणाम जलसिंचनाच्या बाबतीत होऊ शकतात असे शेतकरी बांधवांचे मत आहे .यामुळे जलसिंचन खात्याच्या व गोवा सरकारने सत्तरी तालुक्यातील वेळूस, म्हादई व रगाडा, वाळवंटी या नद्यावर अतिरिक्त बंधाऱ्यांचे उभारणी करावी व मोठ्या प्रमाणात जाणारे पाणी शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करावे अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांनी केलेली आहे.

दाबोस प्रकल्पावर परिणाम नाही.

दरम्यान सत्तरी तालुक्यातील जवळपास ७० टक्के भागांना पिण्याचे पाणी देणाऱ्या दाबोस पाणी प्रकल्पावर मात्र अजून पर्यंत परिणाम झालेले नाहीत. या संदर्भात पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अजून पर्यंत ज्या ठिकाणी दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा कार्यान्वित आहे त्या ठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी उतरलेली नाही. यामुळे या प्रकल्पावर अजूनपर्यंत तरी परिणाम झालेला नाही. येणाऱ्या काळातही या संदर्भाचे परिणाम होण्याची शक्यता सदर अधिकाऱ्यानी धुडकावून लावली आहे. 

हेही वाचा