बालिका आश्रम : नव्या वास्तूत नवे उपक्रम

ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयातून समाजाचा आधारवड ठरलेल्या मातृछाया संस्थेची गोव्यात पाच ठिकाणी केंद्रे आहेत, ज्यांचा उल्लेख कल्याण आश्रम या उचित शब्दाने होत असतो. चैत्र शुद्ध त्रयोदशीला म्हणजे २१ एप्रिल २०२४ रोजी आणखी एका आश्रमाद्वारे ही संस्था सामाजिक कार्याच्या नव्या परिघामध्ये प्रवेश करणार आहे. पन्नाशीकडे वाटचाल करणारी मातृछाया तळावली येथील नव्या आणि सुसज्ज वास्तूचे लोकार्पण या दिवशी करणार आहे.

Story: विचारचक्र |
17th April, 10:37 pm
बालिका आश्रम : नव्या वास्तूत नवे उपक्रम

एखाद्या सामाजिक संस्थेला निस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभल्याने त्या संस्थेचा विस्तार होत राहावा हा केवळ सुदैवाचा भाग नसतो तर त्यामागे निरपेक्ष वृत्तीने कार्य करणारे हात असतात. असे कार्यकर्ते लाभणे आणि त्याचबरोबर त्यांना अनुभवी आणि सालस वृत्तीचे मार्गदर्शक लाभावे, ही तर त्या पुढची पायरी. मातृछाया या संस्थेच्या सतत होत असलेल्या विस्ताराकडे पाहिले की, समाजाला अशा कार्याची किती गरज आहे, याचा प्रत्यय येतो. ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयातून समाजाचा आधारवड ठरलेल्या मातृछाया संस्थेची गोव्यात पाच ठिकाणी केंद्रे आहेत, ज्यांचा उल्लेख कल्याण आश्रम या उचित शब्दाने होत असतो. चैत्र शुद्ध त्रयोदशीला म्हणजे २१ एप्रिल २०२४ रोजी आणखी एका आश्रमाद्वारे ही संस्था सामाजिक कार्याच्या नव्या परिघामध्ये प्रवेश करणार आहे. पन्नाशीकडे वाटचाल करणारी मातृछाया वाडे - तळावली येथील नव्या आणि सुसज्ज वास्तूचे लोकार्पण या दिवशी करणार आहे. सध्या ढवळी येथील आश्रम हे संस्थेचे मुख्यालय आहे. त्या ठिकाणी १८ वर्षांवरील मुली आणि अर्भक यांच्या संगोपनाची जबाबदारी कायम असणार आहे. नव्या वास्तूत नेमके काय नवे असेल, या प्रश्नाला उत्तर देताना संस्थेचे मार्गदर्शक मा. मधुकर दीक्षित आणि मातृछाया न्यास कार्यकारिणीचे सचिव शिरीषकुमार आमशेकर यांनी विविधांगी माहिती दिली. अर्भक, बाल, युवा अशा सर्वच बालिकांना एकत्र ठेवणे हितकारक नसल्याने आणखी एका आश्रमाची गरज असल्याचा विचार २०१८ साली पुढे आला, तथापि कोविडसारख्या महामारीने त्यासंबंधात पुढील पावले उचलणे कठीण गेले. तरीही तळावलीत ४,२०० चौरस मीटर जागा खरेदी करण्यात आली आणि तेथे १,२०० चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत आता बांधून पूर्ण झाली आहे. असंख्य हितचिंतक आणि दाते यांच्या देणगीतून ८० लाख रुपये जमा झाले, अर्थात त्यासाठी सुमारे ३,००० जणांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला. स्थापत्यविशारद रोहीत हेदे तसेच यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मधुकर मल्ल्या यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अविरतपणे झटून बांधकाम पूर्णत्वास नेले आहे. आतापर्यंत झालेले निधी संकलन पुरेसे नसल्याने आणखी हितचिंतकांच्या आर्थिक सहाय्याची मदत लागणार असून, दानशूर देणगीदार ती निश्चितच करतील असा विश्वास मातृछाया पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. नव्या इमारतीत ६ ते १८ वर्षे वयोगटातील ६० मुलींची राहण्याची सोय होणार आहे. तेथे निवास करून या बालिका शिक्षण घेतील. टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी खेळांची सुविधा तेथे उपलब्ध आहे. अभ्यासासाठी खास कक्ष आहे. वाचनालयात पुस्तके व संगणक असतील. भेट देणाऱ्यांसाठी स्वागत कक्ष (गेस्ट रूम) असेल. महत्त्वाचे म्हणजे येथे आरोग्य केंद्र असणार असून, त्याचा लाभ स्थानिक रहिवाशांनाही करून दिला जाणार आहे.

राज्यात निराधार मुले किती असतील, काय करीत असतील, कुठे जात असतील या विचारातून जन्मास आली ती संस्था म्हणजे मातृछाया. विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेने आणि कवळे येथील श्रीशांतादुर्गा देवस्थानने दिलेल्या जागेत लावलेले ते रोपटे होते. मुलांना आपुलकी आणि माया देणारी ही एक संस्था आहे. त्यावेळी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. मेसर्स धेंपो, चौगुले, तिंबले, तळावलीकर, साळगावकर असे प्रतिष्ठित उद्योग समूह या कार्यामागे उभे राहिले आहेत. ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीनिवास धेंपे आहेत. आर्थिक बळ तर आहेच, पण अनेक कार्यकर्ते उभे ठाकले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातृछाया न्यास कार्यकारिणी सतत कार्यरत असते. अनुप केणी अध्यक्ष असून शिरीषकुमार आमशेकर सचिव आहेत. मधुकर दीक्षित, दिलीप देसाई आदी बुजुर्ग सदैव कार्यरत असलेले दिसतात. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समिती निरपेक्ष वृत्तीने काम करते आहे. निवृत्त अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, उद्योजक, हितचिंतक विविध प्रकारे आपले योगदान देतात. गाजावाजा न करता, सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणारी संस्था अशी ओळख असलेल्या मातृछाया ट्रस्टची १९७६ मध्ये नोंदणी झाली. प्रत्येक आश्रमात राष्ट्रीय आणि  धार्मिक सण अभिनव पद्धतीने साजरे केले जातात, हे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल.

दत्तक घेण्याची कायदेशीर तरतूद

आश्रमात येणारी अर्भके तथा बालिका दत्तक देण्याची तरतूद मातृछायाने केली आहे. शासकीय मान्यता प्राप्त असल्याने सर्वच कायदेशीर नियमांचे पालन करून, मुलांना दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. आतापर्यंत या संस्थेने ८०० मुलांना पालक मिळवून दिले आहेत. संबंधित कुटुंबाची सविस्तर माहिती काढून, मुलांच्या सुरक्षतेचा विचार करून कायदेशीरीत्या मुलींना दत्तक देण्याचे हे कार्य म्हणजे आईवडिलांना जसा अपूर्व आनंदाचा क्षण असतो, तसा मुलांनाही पालक मिळाल्याचे समाधान मिळत असते. निराधार म्हणून आलेल्या मुलींना आश्रमात अन्न, निवारा आणि शिक्षण दिले जाते असे नाही, तर उपवर मुलींना योग्य वर शोधून त्यांचे विवाह करण्याचे पुण्यकार्य ही संस्था करते आहे. आतापर्यंत ३० मुलींचा विवाह करण्यात संस्थेने पुढाकार घेतला असून, माहेरवासासाठी या मुली लग्नानंतर आश्रमाला कुटुंबासह भेट देत असतात. त्या मुलींना व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, फार्महाऊस मालक असे पती लाभले असून त्या आपल्या कुटुंबात सुखाने नांदत आहेत. शिक्षणाकडे ओढा असलेल्या मुली पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मजल मारतात. एम.एस्सी. (मायक्रोबायलॉजी) किंवा एम.कॉम. झालेल्या मुली चांगल्या ठिकाणी नोकरीस लागल्या आहेत. एका मुलीने स्पेशल ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश मानावे लागेल.


गंगाराम केशव म्हांबरे 

(लेखक पत्रकार असून विविध विषयांवर 

लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४