दक्षिण गोव्याची भिस्त सासष्टीतील मतदारांवरच !

गत निवडणुकीत सावईकरांना बसला होता फटका ; यावेळी १९ पैकी १४ आमदार भाजपसोबत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 01:00 am
दक्षिण गोव्याची भिस्त सासष्टीतील मतदारांवरच !

पणजी : दक्षिण गोव्यातील १९ मतदारसंघांपैकी नऊ मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी मतांच्या बाबतीत आघाडी घेतली. त्यातील पाच मतदारसंघांत काँग्रेस, मगो आणि अपक्ष आमदार होते. पण सासष्टीसह इतर मिळून दहा मतदारसंघांतील जनतेने काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांना पसंती दिल्यामुळेच सार्दिन यांचा विजय सुकर झाला होता.       

दक्षिण गोव्यात यावेळी भाजपकडून पल्लवी धेंपो आणि काँग्रेसकडून कॅ. विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचे केडर असलेल्या सावईकरांना, तर काँग्रेसने दिग्गज सार्दिन यांना मैदानात उतरवले होते. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत मगो आणि गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत होते. पण निवडणुकीचा निकाल लागताच दोन्ही पक्षांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी भाजपच्या सावईकरांनी १९ पैकी ९ मतदारसंघांत अधिक मते घेतली. त्यात काँग्रेसच्या शिरोडा आणि काणकोण, मगोच्या मडकई आणि सावर्डे, तर अपक्षांच्या सांगे मतदारसंघात त्यांनी आघाडी घेतली होती. इतर दहा मतदारसंघांत मात्र काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांनी मजल मारली. त्यात सासष्टीतील सर्वच मतदारसंघांतील अधिकाधिक मते मिळवण्यात यश आल्यामुळेच सार्दिन यांचा विजय झालेला होता.       

यावेळच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातील १९ पैकी १४ आमदार भाजपकडे आहेत. त्यांच्या जोरावर विजयश्री खेचून आणण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केलेले आहेत. कायम काँग्रेसच्या बाजूने राहणाऱ्या सासष्टीतील ख्रिस्ती मतदारांनाही आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केले आहेत. पण आदमी पक्ष यावेळी काँग्रेससोबत असल्यामुळे भाजपला त्यात कितपत यश मिळणार हे ४ जून रोजीच दिसून येणार आहे.