पिळर्णमध्ये संशयास्पदरीत्या सापडला अज्ञात युवकाचा मृतदेह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:43 am
पिळर्णमध्ये संशयास्पदरीत्या सापडला अज्ञात युवकाचा मृतदेह

म्हापसा : पिळर्ण पर्वरी येथील ऑडिट भवनच्याजवळ एका २० ते २५ वर्षीय युवकाचा संशयास्पदरीत्या जखमी अवस्थेत मृतदेह सापडला. बुधवारी या अज्ञात मृतदेहाची चिकित्सा करण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार आहे.

मंगळवारी पहाटे २ वा. सुमारास गस्तीवेळी पर्वरी पोलिसांच्या पीसीआर रॉबर्ट गाडीतील पोलिसांना ऑडीट भवन जवळ रस्त्याच्याकडेला हा मृतदेह आढळला.

त्यांनी पर्वरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला.

मृताच्या शरीरावर काही जखमा होत्या. या जखमा खुनाच्या हेतूने मारहाण केल्याच्या की हीट अॅण्ड रन अपघातामुळे झाल्या आहेत हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बुधवारी गोमेकॉत शवचिकित्सा केली जाणार आहे. त्यानंतर या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या अज्ञात व्यक्तीच्या अंगावर त्याची ओळख पटवणारी कोणतीही आेळखपत्रे सापडली नाहीत. पर्वरी व आजूबाजूच्या पोलिसांत दुपारपर्यंत कोणी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंद झालेली नाही. त्यामुळे पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पर्वरी पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक जितेंद्र नाईक व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.