एफसी गोवाचा आयएसएल प्रवास संपुष्टात; मुंबई सिटी अंतिम फेरीत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th April, 10:22 pm
एफसी गोवाचा आयएसएल प्रवास संपुष्टात; मुंबई सिटी अंतिम फेरीत

मुंबई : फॉर्मात असलेल्या मुंबई सिटी एफसीने उपांत्य फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये घरच्या मैदानावर एफसी गोवावर २-० असा विजय मिळवून ५-२ अशा फरकाने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२३-२४ हंगामाच्या अंतिम फेरीत धडक मारली.

माजी विजेत्यांची फायनल प्रवेशाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, २०२०-२१ हंगामात त्यांनी अंतिम फेरी गाठताना जेतेपद पटकावले होते. अंतिम फेरीत मुंबई सिटी एफसीसमोर मोहन बागान सुपर जायंटचे आव्हान आहे.

मुंबई फुटबॉल अरेनावर झालेल्या एकतर्फी लढतीत सोमवारी यजमानांनी उत्तरार्धात दोन गोल केले. जॉर्ज परेरा डियाझने ६९व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल केला. यानंतर मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. त्यांनी आक्रमण अधिक प्रभावी करताना आणखी भर घातली. यावेळी फॉर्मात असलेला लालियानझुआला छांगटे पुन्हा धावून आला. त्याने विक्रम प्रताप सिंगच्या पासवर ८३व्या मिनिटाला गोल केला. गोव्यात झालेल्या पहिल्या लेगमध्ये मुंबई सिटी एफसीने ०-२ अशा पिछाडीनंतर शेवटच्या ६ मिनिटांत ३-२ अशी आघाडी घेत अविस्मरणीय विजयाची नोंद केली. हा विजय माजी विजेत्यांची आगेकूच कायम ठेवण्यास महत्त्वपूर्ण ठरला.

मुंबई सिटीने होमग्राउंडवर वरचष्मा राखला तरी एफसी गोवाने चेंडूवर ताबा ठेवण्यासह (५५-४५ टक्के) पासिंग अचूकता (७९-७४ टक्के) तसेच पासेस देण्यातही (३९१-३२०) आणि क्रॉस देण्यात (३०-१६) आघाडी राखली. मात्र, यजमानांची बचावफळी भेदण्यात त्यांना अपयश आले. संपूर्ण सामन्यात १३ पेनल्टी कॉर्नरची नोंद झाली. त्यात मुंबई सिटी एफसीने सात मिळवले. त्यावर गोल करता आला नाही तरी दोन मैदानी गोल करताना यजमानांनी ५-२ अशा फरकासह बाजी मारली. सेमीफायनलच्या दुसर्‍या लढतीतील गोलसंख्या पाहिल्यास एकूण ७ गोल झाले. त्यात मुंबई सिटीचे पाचही गोल सलग आहेत.

आयएसएलच्या दहाव्या हंगामाची महाअंतिम लढत शनिवार, दि. ४ मे २०२४ रोजी कोलकाता येथे रंगेल. त्यात मोहन बागान सुपर जायंट हा घरच्या मैदानावर मुंबई सिटी एफसीशी झुंजेल. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत ओडिशा एफसीवर ३-२ असा विजय मिळवत मोहन बागानने अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते.

निकाल : मुंबई सिटी एफसी २ (जॉर्ज परेरा डियाझ ६९व्या मिनिटाला, लालियानझुआला छांगटे ८३व्या मिनिटाला) वि. एफसी गोवा 0.