गोव्यात इतका चढलाय उष्णतेचा पारा!... उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशभरात उन्हाचा तडाखा...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 04:07 pm
गोव्यात इतका चढलाय उष्णतेचा पारा!... उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशभरात उन्हाचा तडाखा...

पणजी : उत्तरेपासून दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र सूर्य आग ओखत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये तीन दिवसांनी उष्णतेची तीव्र लाट येईल, असा इशारा आज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, गोव्यात गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३३ ते ३५ अंशमध्ये नोंदवले गेले आहे. पुढील सात दिवस गोव्याचा पारा असाच कायम राहण्याची शक्यताही वर्तवली आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये वादळाची परिस्थिती निर्माण होत आहे. अफगाणिस्तानातून सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये एक आठवडा उष्णतेची लाट राहण्याची शक्यता कमी आहे. उष्णतेच्या लाटेचा इशारा असलेल्या राज्यांमध्ये तापमान ४२ अंशांच्या वर नोंदले गेले आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, या तीन राज्यांमध्ये उष्णतेची लाट नाही. दुसरीकडे, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. रविवारी आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक तापमान (४५.२ अंश) नोंदवले गेले.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे तापमानात घट होणार नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या काही दिवसांत त्यात वाढ अपेक्षित आहे.

उष्णतेची लाट कधी येते?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मैदानी भागात तापमान ४० अंश, समुद्र किनाऱ्याजवळील भागात ३७ अंश आणि डोंगराळ भागात ३० अंशांवर पोहोचल्यावर उष्णतेची लाट येते. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा उष्णतेची लाट येते आणि जेव्हा तापमान 6.4 अंशांनी वाढते तेव्हा तीव्र उष्णतेची लाट येते.

हेही वाचा