दबंग स्टाईलने सरपंच प्रशांत नाईक यांनी मांद्रेतील दल्लास हॉटेलला ठोकले टाळे!

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
29th April, 04:20 pm
दबंग स्टाईलने सरपंच प्रशांत नाईक यांनी मांद्रेतील दल्लास हॉटेलला ठोकले टाळे!

कोरगाव : मांद्रे पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याने त्यावर आम्ही कारवाई करू अशी भाषणे यापूर्वी मांद्रेतील स्थानिकांनी एकली होती. मात्र प्रत्यक्षात सरपंच प्रशांत नाईक सरपंच झाल्यावर त्यांनी मांद्रेमध्ये बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये आज सकाळी आश्‍वे येथील दल्लास हॉटेलला दबंग स्टाईलने टाळे ठोकले. त्यांच्याजवळ पंचायतीचा परवाना नव्हता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

जानेवारी महिन्यात ग्रामसभेत आश्‍वे येथील स्थानिक यशवंत सावंत यांनी दल्लास हॉटेलचा प्रश्न उपस्थित केला होता. पंचायतीकडून कुठलीच परवानगी न घेता व्यवसाय सुरू असल्याचे पंचायतीच्या लक्षात आणून दिले होते. दरम्यान, तत्कालीन सरपंच अमित सावंत यांनी यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नव्हती. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा याची आठवण करून दिल्यानंतर सरपंच प्रशांत नाईक यांनी याची दखल घेऊन योग्य कारवाई केली.

पंचायतीच्या २१ मार्च २०२४ च्या पंधरावड्याच्या बैठकीत पंचसदस्य किरण सावंत यांनी येथे बेकायदेशीर काम सुरू असल्याचा विषय मांडला होता. दरम्यान याचीही दखल सरपंच प्रशांत नाईक यांनी घेतली. आश्‍वे येथील आजोबा देवस्थानाजवळ हे बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. पंचायतीने याची दखल घेत दिलेली परवानगी मागे घेतली होती.

बेकायदेशीर गोष्टींना थारा देणार नाही : सरपंच

मांद्रे गावात बेकायदेशीर व्यवसायांना आम्ही थारा देणार नाही. मांद्रेत व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी पंचायतीकडून कायदेशीररित्या परवानगी घ्यावी आणि व्यवसाय करावा. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. स्थानिक पंचसदस्यांनी बैठकीत तर ग्रामस्थ यशवंत सावंत यांनी ग्रामसभेत बेकायदेशीर सुरु असलेल्या हॉटेलची तक्रार केली होती, असे सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा