मध्यप्रदेशात काँग्रेसला जबर झटका; उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 04:19 pm
मध्यप्रदेशात काँग्रेसला जबर झटका; उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

इंदोर : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी इंदोर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या जागेवर अक्षय कांती बाम आणि भाजपचे उमेदवार शंकर ललवाणी यांच्यात लढत होणार होती. मात्र, सोमवारी अक्षय यांनी निवडणूक कार्यालय गाठून उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता ते भाजपचे सदस्यत्व घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.

अक्षय कांती यांच्या या कृतीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून बाम यांना निवडणुकीचे तिकीट देण्याच्या पक्ष हायकमांडच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. इंदोर शहर काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना अक्षय बाम यांच्याबद्दल चेतावणी दिली होती. ते उमेदवारी मागे घेतील, असा इशारा दिला होता. आमच्यासारखे पक्षाचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे त्याचे गंभीर परिणाम भोगत आहेत, याचे आम्हाला दुःख आहे. २००० पासून काँग्रेसची सेवा करत आहे, तरीही त्यांच्यासारख्या लोकांना तिकीट देण्यात आले’, असे यादव यांनी म्हटले आहे.

भाजपने अक्षय कांतीचे स्वागत केले

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विटरवरून बम यांचे स्वागत केले आहे. ‘इंदोरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय बम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये स्वागत आहे’, असे त्यांनी पोस्ट केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत इंदूरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. इंदूरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यापूर्वी सुरतच्या जागेवरही असाच प्रकार घडला होता, जिथे भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला होता.

कोण आहेत अक्षय कांती बाम?

बाम हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांचे कुटुंब शहरात खासगी महाविद्यालये चालवते. ते जैन समाजाचे आहेत. इंदोर लोकसभा मतदारसंघात या समाजाचे सुमारे दोन लाख मतदार आहेत. बाम यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. बाम यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत इंदोर-४ मतदारसंघातून तिकिटाचा दावा केला होता, परंतु काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही.

हेही वाचा