धारगळमध्ये अवजड वाहनाचा उच्च दाबाच्या वीजतारेला धक्का, ६ खांब कोसळले; वाहतूक ठप्प

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
29th April, 04:34 pm
धारगळमध्ये अवजड वाहनाचा उच्च दाबाच्या वीजतारेला धक्का, ६ खांब कोसळले; वाहतूक ठप्प

कोरगाव : धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका अवजड वाहनाचा ११ केव्हीच्या वीजवाहिनीला धक्का लागल्याने तारेसह तब्बल सहा वीजखांब मोडून कोसळले. या घटनेमुळे त्या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पेडणे वीज कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.


पेडणे-धारगळ, दोन खांब महामार्ग ६६ येथे दुपारी सुमारे २:३० वाजता महामार्गावरून जाणाऱ्या एका केए २८ एए ९३३७ अवजड टँकरचा ११ केव्हीच्या वीजवाहिनीला धक्का लागल्याने तारेसह तब्बल सहा वीजखांब मोडून कोसळले. यावेळी वाहनांची ये-जा कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वेळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी लोकांनी संबंधित कार्यालयात कळविल्यावर त्वरित वीज खात्याचे कर्मचारी, पेडणे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत चोडणकर, तसेच पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वीज खात्याचे कर्मचारी पेडणे वाहतूक पोलीस आणि पेडणे पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सध्या कोसळलेल्या विजेचे खांबा काढण्याचे काम सुरू आहे.

वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वीज खांब पुन्हा जागेवर उभे करून वीज पुरवठा करण्यासाठी सोमवारी रात्री अंदाजे साडेआठ पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, यावेळी नागरिकांनी येथील वीज खांब नवीन बसविलेले आहेत. मात्र, अयोग्य पद्धतीने बसवल्यामुळे ते कमकुवत असून ते पुन्हा बसवावे, अशी मागणी केली.

दोन खांब, धारगळ येथे अनेक दुर्घटना घडतात. वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या बाजूला असलेले वीज खांब भूमिगत करून वीजवाहिन्या टाकल्या असत्या तसेच प्रवाशांसाठी सर्व्हिस रोडची सोय केली असती तर अशाप्रकारची दुर्घटना घडली नसते. या भागात दिवसेंदिवस अपघातात वाढत होत असून सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. _राजन कोरगावकर, स्थानिक                     

हेही वाचा