ईडन गार्डनवर सॉल्टचे तडाखे; दिल्ली पराभूत

कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून विजय : चक्रवर्तीचे ३ बळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th April, 11:35 pm
ईडन गार्डनवर सॉल्टचे तडाखे; दिल्ली पराभूत

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य होते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने १६.३ षटकांत अवघ्या ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. 

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर २३ चेंडूत ३३ धावा करून नाबाद परतला. व्यंकटेश अय्यर २३ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ५७ धावांची भागीदारी झाली. दिल्ली कॅपिटल्ससाठी अक्षर पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अक्षर पटेलने कोलकाता नाईट रायडर्सच्या २ फलंदाजांना बाद केले. याशिवाय लिझार्ड विल्यम्सने १ बळी आपल्या नावावर केला.

दिल्ली कॅपिटल्सच्या १५३ धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. केकेआरचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी झंझावाती सुरुवात केली. विशेषत: फिल सॉल्ट अतिशय आक्रमक पद्धतीने दिसला. फिल सॉल्टने ३३ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार मारले. सुनील नरेन १० चेंडूत १५ धावा करून बाद झाला, पण तोपर्यंत दोन्ही सलामीवीरांनी आपले काम चोख बजावले होते. फिल सॉल्ट आणि सुनील यांनी पहिल्या ६ षटकांत ७९ धावा जोडल्या. मात्र, केकेआरला पहिला धक्का ७९ धावांवर बसला. यानंतर फिल सॉल्ट ९६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी रिंकू सिंगचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. रिंकू सिंग ११ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरच्या संघाला ९९ धावांच्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला.

दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ९ बाद १५३ धावा केल्या. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.      


दिल्लीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो      

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ ७ चेंडूंत १३ धावा करून बाहेर पडला. ७ चेंडूंत १२ धावा करून जॅक फ्रेजर मिचेल स्टार्कचा बळी ठरला. त्याचवेळी अभिषेक पोरेल १५ चेंडूंत १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय शाई होप, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स आणि कुमार कुशाग्र हे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने २७ धावा केल्या, पण त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. परिस्थिती अशी होती की ९९ धावांत दिल्ली कॅपिटल्सचे ६ फलंदाज पॅव्हेलियनकडे वळले होते.      

मात्र, फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर कुलदीप यादवने जबाबदारी स्वीकारली. कुलदीप यादवने २६ चेंडूत ३५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने १५० धावांचा टप्पा पार केला. ऋषभ पंतचा संघ दीडशे धावांचा आकडा गाठू शकणार नाही असे वाटत होते, मात्र अखेर त्यांनी हा टप्पा गाठलाच.      

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ फलंदाजांना आपले लक्ष्य बनवले. तर वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी २-२ बळी घेतले. याशिवाय मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी १ यश मिळाले.