पोलिसाला मारहाण करणाऱ्या पवन तिरकेला अटकपूर्व जामीन मंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:38 am
पोलिसाला मारहाण करणाऱ्या पवन तिरकेला अटकपूर्व जामीन मंजूर

म्हापसा : आंगड म्हापसा येथे रोडरेजवरुन एका पोलिसाला मारहाण करून त्याच्या मित्रांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पवन तिरके याचा अटकपूर्व जामीन अर्ज म्हापसा न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला.

मारहाण प्रकरणानंतर पवन तिरके हा फरार झाला होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने संशयिताचा हा अर्ज मंजूर केला. संशयिताच्यावतीने अॅड. अनुप कुडतरकर यांनी युक्तिवाद केला.

ही घटना गुरूवार, दि. ११ एप्रिल रोजी उत्तररात्री १.४५ वा. सुमारास आंगड येथील कळंगुटकर हॉस्पिटलजवळ घडली होती. संशयित आरोपी पवन तिरके (कार चालक) हा संशयित जोवित कुतिन्हो याच्यासोबत जीए ०३ एच ०५६९ क्रमांकाच्या स्कोडा कारमधून म्हापशाहून हळदोणाच्या दिशेने जात होता. तर जखमी पोलीस कर्मचारी मल्लेश जोडी (कार चालक) हा जीए ०३ झेड ७१३३ क्रमांकाच्या बलेनो कारमधून मित्र महेश दळवी (फिर्यादी), तेजस गुरव, शरद भातकांडे यांच्यासोबत विरूद्ध दिशेने येत होता.

घटनास्थळी स्कोडा कारची धडक बलेनो कारला बसून अपघात घडला. यानंतर पवन तिरके व मल्लेश जोडी यांच्यात बाचाबाची व झटापट झाली. त्यानंतर पवन तिरके याने फोन करून आपल्या मित्रांना घटनास्थळी बोलावले. तिथे संशयित राज, एलरिच फर्नांडिस व इतर काहीजण आले. त्यांनी मल्लेश जोडी याला जबर मारहाण केली आणि त्याच्या मित्रांनाही गंभीर परिणामाची धमकी दिली. तसेच संशयितांनी आपल्या कारमधील दारूच्या बाटल्या या पोलिसांच्या गाडीत घालून त्याचा व्हिडिओ करून पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

नंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांना पाहून संशयितांनी कारसह धूम ठोकली. हळदोणा परिसरात सुमारे ८० किलोमीटर पर्यंत या संशयितांनी गाडी भरधाव वेगात चालवून पोलिसांची दमछाक करण्याचाही प्रयत्न केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी जोवित कुतिन्हो (हळदोणा) व एलरिच फर्नांडिस (नास्नोळा) या दोघांना अटक केली होती. त्यांची म्हापसा न्यायालयात सशर्थ जामिनावर सुटका झाली. तर पवन तिरके व राज हे दोघे संशयित फरार होते.