गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्या तिप्पट

पहिल्या तीन महिन्यांत गेल्यावर्षी २४, तर यंदा ७७ रुग्ण


30th April, 12:11 am
गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्या तिप्पट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले होते. २०२४ मध्ये याच तीन महिन्यांत डेंग्यूचे ७७ रुग्ण सापडले आहेत. यांतील बहुतेक प्रकरणे ही स्थलांतरित कामगारांच्या वस्तीत साठवून ठेवलेल्या पाण्यातील डासांच्या पैदासीने झाली आहेत. असे असले तरी आरोग्य खात्याने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे एप्रिल महिन्यातील डेंग्यूची रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी व्यक्त केला.
राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत वास्को, मये, साखळी, डिचोली, म्हापसा, खोर्ली, कांदोळी, शिवोली, साळगाव, कोलवाळ, पेडणे, कुडचडे येथे डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. शक्यतो उन्हाळ्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त आढळत नाहीत. यंदा बहुतेक प्रकरणे स्थलांतरित कामगार वस्ती किंवा बांधकाम कामगारांच्या वस्तीमध्ये आढळून आली आहेत. पाण्याची टंचाई असल्याने अशा वस्तीत पाणी साठवून ठेवले जाते. या पाण्यात डासांची पैदास होऊन ते चावल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
या तीन महिन्यांत स्थानिकांना डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रत्येकाने आपल्या घरात झाडांच्या कुंड्या, फ्रिज, एसी किंवा अन्य ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दर सात दिवसांनी असे साचेलेले पाणी काढून टाकले पाहिजे. घराभोवती, कुळाघरात पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असे केल्यास डेंग्यूचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
खात्याकडून विविध उपक्रम
डेंग्यूची लागण कमी करण्यासाठी जागृती कार्यशाळा, स्पर्धा घेतल्या जात आहेत. पंचायत आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा गोळा व उचल करणे, विहिरीत गप्पी मासे सोडणे, जुनी टायर गोळा करणे असे उप्रकम राबविले जात असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

....
१५ महिन्यांत ‘इंडीजिनियस मलेरिया’चा एकही रुग्ण नाही
जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या १५ महिन्यांत ‘इंडीजिनियस मलेरिया’चा (स्थानिक पातळीवरील) एकही रुग्ण आढळलेला नाही. दक्षिण गोवा जिल्ह्याला ‘इंडीजिनियस मलेरिया’मुक्त घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत तीन ते चार महिन्यांत पुढील सूचना मिळणार आहे. एक किंवा तीन वर्षे ‘इंडीजिनियस मलेरिया’चे रुग्ण न आढळणे आणि मलेरियामुळे मृत्यू न होणे या दोन निकषांवर मलेरियामुक्तीची घोषणा केली जाते. राज्यात स्थानिकांना मलेरिया होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. स्थलांतरित कामगार वस्तीत मलेरियाचे प्रमाण जास्त आहे, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

हेही वाचा