सोने तस्करीप्रकरणी नवीन कुमारचा जामीन अर्ज फेटाळला

डीआरआयने गोव्यातून केली होती अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
16th April, 11:51 pm
सोने तस्करीप्रकरणी नवीन कुमारचा जामीन अर्ज फेटाळला

पणजी : सोने तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) बंगळुरू आणि गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोळीचा मुख्य सूत्रधार नवीन कुमार रामलिंगम याला गोव्यातून अटक केली होती. त्याने बंगळुरू येथील आर्थिक गुन्हा न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

डीआयआरच्या बंगळुरू अधिकाऱ्यांनी २२ डिसेंबर २०२३ रोजी बंगळुरू येथील कैम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून बँकाॅकहून आलेल्या बंगळुरू येथील आर. इंद्रायणी आणि महेश्वरी रामलिंगम या आई- मुलीला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १.१० कोटी रुपये किमतीचे १.६ किलो सोने सापडले. त्यानंतर डीआरआयने त्यांच्या घरावर छापा टाकून १ कोटीचे १.४ किलो सोने, चांदी आणि विदेशी चलन जप्त केले होते. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, नवीन कुमार रामलिंगम याने त्यांना बँकाॅकमध्ये पाठवल्याची माहिती समोर आली.

डीआयआरच्या बंगळुरू आणि गोवा विभागाने ६ रोजी पिळर्ण येथील एका फ्लॅटवर छापा टाकून मुख्य सूत्रधार नवीन कुमार रामलिंगम याला अटक केली. त्यानंतर त्याला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांडवर बंगळुरूला नेले. त्यानंतर त्याला बंगळुरू येथील आर्थिक गुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. याच दरम्यान त्याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता, त्याच्या विरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.

सोने तस्करीचा सूत्रधार नवीन कुमार

डीआरआयने १७ मार्च २०२४ रोजी बंगळुरू विमानतळावर सापळा रचून दीपक कुमार यू, नागेंद्र कृष्णा, शिंधू कुलकर्णी आणि वेदावथी नागप्पा या चार प्रवाशांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १.१० कोटी रुपये किमतीचे १.६ किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नवीन कुमार रामलिंगम असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता, तो गोव्यात असल्याचे समोर आले.