संकटग्रस्तांना वाचविण्यात अग्निशामक दल नेहमीच तत्पर : नितीन रायकर

राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन साजरा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 12:43 am
संकटग्रस्तांना वाचविण्यात अग्निशामक दल नेहमीच तत्पर : नितीन रायकर

पणजी : राज्य अग्निशामक दल संकटात सापडलेल्या व्यक्ती, प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी, तसेच आगीच्या घटनांत बचाव कार्यासाठी नेहमीच तत्पर असते, असे दलाचे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले. 

अग्निशामक दल आणि निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पणजीत आयोजित राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य अग्निशामक दलाने गतवर्षी आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या १९४ व्यक्ती आणि ७५७ प्राण्यांना जीवदान देण्यासह १७९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवल्याची माहिती दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली. 

प्रमुख पाहुणे आयएएस संजीत रॉड्रिग्स यांच्यासह दलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.       

नितीन रायकर म्हणाले की, गतवर्षी दलाला सुमारे आठ ह​जार कॉल्स आले होते. त्यांतील तीन हजार कॉल्स आगीशी संबंधित, तर पाच हजार कॉल्स आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात होते. यात दलाने आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या १९४ व्यक्ती आणि ७५७ प्राण्यांना जीवदान दिले. शिवाय १७९ कोटींची मालमत्ताही वाचवली, असे ते म्हणाले. आगीच्या घटनांसंदर्भात दलाकडून वारंवार जागृती करण्यात येत आहे. त्यासाठी यावर्षी सात ते दहा वर्षे आणि अकरा ते चौदा वर्षे अशा दोन वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, राज्याच्या अग्निशामक दलाचे जवान स्वत:चे जीव धोक्यात घालून आग, तसेच इतर प्रकारच्या आपत्कालीन स्थितीत सापडलेल्या नागरिक, प्राण्यांचे जीव वाचवत आहेत. स्थानिकांच्या मालमत्तेचे रक्षण करत आहेत. प्रत्येकवर्षी त्यांच्याकडून दर्जेदार कामगिरी होत असल्याचे आयएएस संजीत रॉड्रिग्स यांनी नमूद केले.      

दलाचे जवान, पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

अग्निशामक दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवानांचा, तसेच पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा या कार्यक्रमात संजीत रॉड्रिग्स यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवाय अग्निशमनासंदर्भात प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.

हेही वाचा