किमान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला मत द्या

भास्कर असोल्डेकर : गोव्यातील १६ पैकी ४ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 12:04 am
किमान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला मत द्या

गोव्यातील उमेदवारांची माहिती देताना भास्कर असोल्डेकर. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याकडे पैसा अधिक आहे, अशा उमेदवारांची निवड होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे किमान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनाच मतदान करा, असे आवाहन असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)चे गोवा समन्वयक भास्कर असोल्डेकर यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडीआरकडून उमेदवारांचा राजकीय डाटा जाहीर करण्यात आला. यावेळी असोल्डेकर बोलत होते. यावेळी सात चरणात देशात निवडणुका होत आहेत. काही मतदारसंघांना अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहे. कारण त्या मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन सुरक्षा वाढविण्यात आली​ आहे. यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील मतदारसंघाची यादी जाहीर केली.
ते म्हणाले, गोव्यात उभे असलेल्या १६ उमेदवारांपैकी चार उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. चार उमेदवारांपैकी एकावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीला उभे राहू नये, या मताचे आम्ही आहोत. पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ नये. राजकीय पक्षांनी आपल्या निवड प्रक्रियेत प्रत्येक वेळी सुधारणा केल्या पाहिजेत. जेव्हा मतदार मतदान करायला केंद्रावर जाणार तेव्हा त्याने कमी गुन्हे असलेल्या उमेदवाराला मतदान करावे. ही प्रक्रिया नियमित सुरू झाल्यास तीन-चार निवडणुका झाल्या की स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार मिळू शकतात, असे मत असोल्डेकर यांनी व्यक्त केले.
न्याय प्रक्रियेला गती देण्याची गरज : असोल्डेकर
काही उमेदवारांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. परंतु अद्याप त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही. या न्यायप्रक्रियेला गती देण्याची गरज आहे. लवकरात लवकर न्याय मिळण्याची गरज आहे. जर एखाद्या उमेदवारावरील खटला १५ वर्षे चालला तर आपण काय करू शकतो? कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने २ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला, तर ती व्यक्ती तुम्ही निवडणुकीला उभी राहू शकत नाही. नवीन उमेदवार असो किंवा अनुभवी असाे, सर्वांसाठी हा कायदा लागू आहे. ज्यांच्याकडे पैशासह मसल पॉवर आहे त्यांना जिंकण्याची संधी अधिक आहे. गोव्यात बक्कळ पैसा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ४० पैकी ९ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि भरपूर पैसा असलेले उमेदवार निवडून आले आहेत, असे असोल्डेकर यांनी सांगितले.

हेही वाचा