विधानसभा निवडणुकीतील विरोधक धेंपोंच्या प्रचारासाठीआले एकाच मंचावर

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, अँथनी बार्बोझा यांच्यात ‘दिलजमाई’

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 11:59 pm
विधानसभा निवडणुकीतील विरोधक धेंपोंच्या प्रचारासाठीआले एकाच मंचावर

पल्लवी धेंपाे यांच्या प्रचारासाठी एकाच व्यासपिठावर आलेले आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व अँथनी बार्बोझा.

मडगाव : भाजपकडून दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेत एकमेकांविरोधातील लढलेल्या दिगंबर कामत व बाबू आजगावकर यांच्यानंतर कुडतरीतील अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड व भाजप उमेदवार अॅंथनी बार्बोझा हे एकाच मंचावर दिसले. भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपो यांना निवडून आणण्यासाठी हे नेते एकत्र आले आहेत.
धेंपो यांच्या प्रचारासाठी कुडतरी मतदारसंघातील हाऊसिंग बोर्ड परिसरातील प्रचार सभेला अपक्ष आमदार रेजिनाल्ड हे उपस्थित होते. भाजप एसटी नेते अँथनी बार्बोझा व भाजप महिला नेत्या डॉ. स्नेहा भागवत याही मंचावर होत्या. त्यांनीही उमेदवाराच्या समर्थनार्थ भाषण देत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.
आमदार रेजिनाल्ड आणि अँथनी बार्बोझा यांच्यातील मैत्री दिसून आली. दोन वर्षांपूर्वी बार्बोझा यांनी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत रेजिनाल्ड यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेजिनाल्ड यांनी पाठिंबा देऊनही मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यावरून कुडतरीमधील भाजपची टीम त्यांच्यावर टीका करत होती. दक्षिण गोव्याची जागा जिंकण्यासाठी मतदारांना एकत्रित करण्यात भाजपकडून कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाही. कुडतरी भाजप मंडळ आणि अपक्ष आमदार भाजप पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावीत यासाठी एकत्र आल्याचे दिसत आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठी आघाडी मिळालेली होती.