राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:49 am
राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक

पणजी : राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक म्हणजेच पर्मनंट एज्यूकेशन नंबर (पीईएन) देण्यात येणार आहे. काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शौक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना ‘यु -डीआएसई +’ (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फोर एज्युकेशन) या प्रणालीमध्ये ट्रॅक करणे सोयीस्कर होणार आहे. गुरुवारी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘यु -डीआएसई +’ च्या पोर्टलवर ११ अंकी कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक तयार करणे आवश्यक आहे. सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विशेष विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांना हा क्रमांक विद्यार्थांना द्यावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक आणि ‘यु -डीआएसई’ कोड असणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थांना याबाबत काही शंका असल्यास गोवा समग्र शिक्षाच्या ब्लॉकस्तरीय केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन झिंगडे यांनी आदेशाद्वारे केले आहे.

शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यायार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासह अन्य बाबतीतही उपयुक्त ठरणार आहे. यामुळे दहावीपूर्वी शाळा सोडणाऱ्या विद्यार्थांना दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या राज्यातील शिक्षण मंडळात प्रवेश घेणे सुलभ होणार आहे.