श्रीपाद भाऊंकडे ओळखपत्र नव्हते, पण ‘या’ एका गोष्टीमुळे करता आले मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 11:09 am
श्रीपाद भाऊंकडे ओळखपत्र नव्हते, पण ‘या’ एका गोष्टीमुळे करता आले मतदान

पणजी : मतदानासाठी मतदान केंद्रावर जाताना निवडणूक ओळखपत्र दाखवल्याशिवाय संबंधित मतदाराला मतदान करता येत नाही. अशीच पंचाईत केंद्रीय मंत्री तथा भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांची आज सकाळी झाली. ओळखपत्र सोबत न घेताच मतदानासाठी मतदान केंद्रावर ते गेले. तेथे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. परंतु, ते ओळखपत्र दाखवू शकले नाहीत. अखेर ‘एका’ गोष्टीमुळे अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली.

उत्तर गोव्यात भाजपने यावेळी सलग सहाव्यांदा श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्याची उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अॅड. रमाकांत खलप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) मनोज परब उभे आहेत. यावेळी उत्तर गोव्यात तिरंगी आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता आहे. सकाळच्या सत्रात प्रथम रमाकांत खलप आणि मनोज परब यांनी मतदान केले. त्यानंतर श्रीपाद नाईक मतदानासाठी केंद्रावर पोहोचले. पण, त्यांच्याकडे ओळखपत्रच नव्हते. त्यावेळी नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत: निवडणुकीत उमेदवार असल्याचे कार्ड दाखवले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास परवानगी दिली. निवडणुकीतील उमेदवारांना सरकारकडून आयडी कार्ड मिळते. हे आयडी​ कार्डच त्याचे ओळखपत्र असते, हा नियम आहे. त्यामुळे या कार्डच्या आधारे आपण मतदानाचा अधिकार बजावला, असे नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांत उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा