फंडपेट्यांच्या बदल्यात क्यूआर कोड ठेवा!

‘चर्चेची वार्ता’ मधून सूर : नेहमी बँक खात्यात पैसे जमा करावेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:54 am
फंडपेट्यांच्या बदल्यात क्यूआर कोड ठेवा!

पणजी : राज्यात अनेक ठिकाणी मंदिरातील फंडपेटी फोडून चोरी करण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे. अलिकडेच भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. चोरट्यांनी फंडपेटीतील १० ते १२ लाखांची रक्कम पळवली होती. या पार्श्वभूमीवर ‘चर्चेची वार्ता’ या सदरात वाचकांना ‘मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी फंडपेट्यांच्या बदल्यात क्यूआर कोड ठेवा, अशी मागणी केलेली दिसत आहे.

देवळात फंडपेटी न ठेवता आता क्यूआर कोड ठेवावेत. यामुळे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. यामुळे चोरीचा प्रकारही घडणार नाही आणि पोलिसांनाही त्रासही होणार नाही, असे सुरेंद्र मडकईकर यांनी सांगितले. 

गोव्यात मंदिर कार्यकारी समित्या व महाजन यांच्या सहकार्याने कार्य शिस्तबद्धरितीने चालावे यासाठी तसे नियम त्या- त्या मंदिरांच्या नियमावलीत घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे मंदिरातील कार्यकारी समिती सदस्यांकडून व महाजन मिळून कार्य होत आहे. अपवाद काही मंदिर समित्यांच्या अनागोंदी कारभारामुळे व बेजबाबदारपणामुळे फंडपेटी व इतर चोरीचे प्रकार होत आहेत. ज्या मंदिरात सततची गर्दी होत असते त्या मंदिरात मोठ्या प्रमाणात दान होत असते. त्यामुळे आठवडा, पंधरवड्यात किंवा महिन्याच्या अंतराने फंडपेटीतील पैसे काढून बँकेत जमा करणे जरुरीचे असते, असे सुदेश तिवरेकर यांनी सांगितले.

सर्व मंदिरांतील फंडपेट्या काढून टाकल्या पाहिजेत आणि भक्तांना डिजिटल पेमेंटचा मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे. यामुळे फंडपेटी फोडण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही आणि देणगीच्या हिशेबात हेराफेरी होणार नाही, जयराम रेडकर यांनी सांगितले.

फंडपेटी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा उघडून जमा झालेली रक्कम मोजून बँक खात्यात जमा करावी किंवा फंडपेटीची अतिरिक्त सुरक्षा वाढवावी, असे राजेंद्र पेडणेकर यांनी सांगितले.

डिजिटल इंडियात देवाला पैसेही डिजिटली द्यावेत, असे विजया पाटील यांनी सांगितले. 

भाविक मंदिरामध्ये आपली श्रद्धा म्हणून दानधर्म करत असतात. त्यांनी स्वकष्टातून अर्पण केलेले पैसे, दागिने चोरीला जाणे हा त्या भक्तांचाही अपमान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम चोरली जाते याचा अर्थ बऱ्याच गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. मंदिराच्या सुरक्षेबरोबरच रोजच्या रोज मंदिराला अर्पण करण्यात आलेली रक्कम बँकेत जमा होणे आणि त्याचा मंदिर व्यवस्थापन कार्यासाठी उचित वापर होणे आवश्यक आहे, असे सृष्टी हजारे यांनी सांगितले. 

फंडपेटीत मोठ्या प्रमाणात धनसंचय न करता वेळोवेळी ते पैसे काढून बँकमध्ये ठेवले जावेत. पोलिसांनी गस्त वाढवावी. अपरिचीत व्यक्तींची चौकशी करून परराज्यातील संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवावी. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने खूप दक्षता घेणे आवश्यक आहे, असे वासुदेव गवस यांनी सांगितले.