श्री लईराई देवीच्या जत्रेत पाच दिवसांत कधीही ओटी भरा!

देवस्थानतर्फे आवाहन : जत्रेदिवशी गर्दी न करण्याची विनंती

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 10:28 pm
श्री लईराई देवीच्या जत्रेत पाच दिवसांत कधीही ओटी भरा!

पणजी : शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रेच्या दिवशी ओटी भरण्यासाठी एकाचवेळी गर्दी न करता जत्रेच्या पाच दिवसांत कधीही येऊन ओटी भरावी, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी केले आहे.


गोवा तसेच शेजारच्या राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी जत्रेच्या दिवशी येत असतात. धोंड भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देवळात एकाचवेळी गर्दी होऊन भक्तजन, तसेच सर्वच भाविकांची मोठी गैरसोय होते. श्री देवी लईराईचा जत्रोत्सव पाच दिवस चालू असतो. त्यामुळे या ५ दिवसांत आपल्या सवडीनुसार ओटी भरल्यास मंदिरातील गर्दी कमी होईल व लोकांनाही त्रास होणार नाही, असे आवाहन अध्यक्ष गावकर यांनी केले.


श्री लईराईदेवीची जत्रा १२ मे रोजी असून धोंड, तसेच इतर सर्व भाविकांना दर्शनासाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान समितीचे प्रयत्न सुरू आहेत, असेही गावकर यांनी सांगितले.