म्हापशात आज अमित शहांची सभा

२० ते २५ हजारांची गर्दी भाजपला अपेक्षित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:52 am
म्हापशात आज अमित शहांची सभा

म्हापसा : येथील नवीन कदंब बसस्थानकावर शुक्रवार, दि. ३ रोजी संध्याकाळी ६ वा. गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी जिल्हा प्रशासन, पोलीस, सुरक्षा यंत्रणा तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सभास्थळाची संयुक्त पाहणी केली व सभेच्या तयारीचा आढावा घेतला. गोव्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे ६व्यांदा निवडणूक लढवत आहेत. नाईक यांच्या प्रचारार्थ गेल्या २४ मार्चला म्हापशात गृहमंत्र्यांची जाहीर सभा होणार होती. पण ती शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सभा शुक्रवारी होणार आहे.

सभास्थळी पाहणी केल्यानंतर माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले, ही सभा यशस्वी करण्यासह व्यवस्थापनाबाबत आम्ही प्रशासकीय व सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला. सभेत २० ते २५ हजार लोकांची उपस्थिती असेल. गोवा पोलिसांसह सीआरपीएफ जवानांचे सभास्थळाच्या आवारात सुरक्षा कवच असेल.

सुरक्षेतेसाठी गोवा पोलिसांचे ५०० कर्मचारी गणवेशात, २०० पोलीस साध्या वेशात सभेस्थळी असतील. मोपा विमानतळ ते सभास्थळपर्यंतच्या मार्गावर अतिरिक्त २०० पोलीस तैनात केले जातील. शिवाय सीआरएफ जवान असणार आहेत.

शक्तीप्रदर्शनाची तयारी

या सभेस्थळी २० ते २५ हजार लोक जमा करून सभा यशस्वी करण्यासह शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, मंत्री आमदारांनी कंबर कसली आहे. नवीन कदंब बसस्थानकाची जागा व आसन व्यवस्थेचा विचार केल्यास २५ हजारांच्या गर्दीला ही जागा अपुरी पडू शकते.

महाराष्ट्र दौऱ्यानंतर शहा गोव्यात

गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचा दौरा करुन गोव्यात दाखल होतील. मोपा विमानतळावर उतरल्यानंतर शहांचा ताफा म्हापशात सभास्थळी पोहचेल. संध्याकाळी ७ पर्यंत ते सभेला संबोधित करण्याची अपेक्षा आहे.