रेल्वे भू संपादनाविरोधात सुरावलीवासीयांची एकजूट

रेल्वेमुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd May, 11:58 pm
रेल्वे भू संपादनाविरोधात सुरावलीवासीयांची एकजूट

सुरावली येथे बैठकीला उपस्थित नागरिक.  

मडगाव : सुरावलीतील रेल्वे रुळानजीकच्या जमीन मालकांना रेल्वेकडून भू संपादनाबाबतच्या नोटीसा आलेल्या आहेत. याबाबत सुरावलीतील नागरिकांनी गुरुवारी बैठक घेत दोन रेल्वे रुळ असताना आणखी रुळ कशासाठी, असा सवाल केला. दरम्यान, या प्रक्रियेला बैठकीत विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेमुळे सुरावलीतील लोकांचे जीवन विस्कळीत होत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
सुरावली ग्रामस्थांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित बैठकीत रेल्वेकडून करण्यात आलेल्या भू संपादन नोटिसांवर चर्चा करण्यात अाली. पंचायत मंडळातील सदस्यांसह आमदार व्हेंझी व्हिएगस यांना लोकांनी बोलावून घेतले होते. पोर्तुगीज काळात सुरावलीतून रेल्वे रुळ टाकण्यात आलेले होते. त्यावेळी रेल्वेच्या जागेची माहिती देणारे दगडही लावण्यात आलेले होते. सध्या ते दगड दिसत नसून रेल्वे प्रशासन लोकांच्या जमिनीतही आपली मालकी सांगत आहे. सुरावलीतील रेल्वे रुळानजीकच्या ज्या जमिनी लोकांकडे आहेत, त्यावर रेल्वेचे नाव लागल्याचेही दिसून आलेले आहे. याशिवाय विद्युतीकरणावेळी माड व इतर झाडे तोडण्यात आली. याबाबत वन खात्याला कळवल्यास रेल्वेला कोणत्याही परवानगीची गरज पडत नसल्याचे सांगण्यात आले.
यावेळी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी लोकांची मते जाणून न घेता प्रकल्प लादण्याचे राज्य सरकारने बंद न केल्यास लोक कोणत्याही प्रकल्पाला सहकार्य करणार नाहीत, असे स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांचा आक्षेप
- रेल्वेच्या फेऱ्या वाढल्याने येथील लोकांची घरे, प्रार्थनास्थळांना धोका पोहोचत आहे, लोकांना आवाजाचा व जमिनीच्या हादरल्याचा त्रास होतो.
- काहीवेळा रेल्वे थांबवून ठेवण्यात येतात व लोकांना दुसऱ्या बाजूला जात येत नाही. रेल्वेकडून आवश्यक ती सोय करून देण्याचे आश्वासन पाळण्यात आलेले नाही.
- अलीकडे आणखी जमीन संपादित करण्याचा घाट घातला जात असून त्याला नागरिकांनी आक्षेप घेतला.