कर्करोग हे मृत्यूचे जगातील दुसरे कारण!

वेळीच उपाय केल्यास होऊ शकतो बरा : डॉ. अविनाश आनंद

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
05th May, 08:41 pm
कर्करोग हे मृत्यूचे जगातील दुसरे कारण!

नावेली : आजपर्यंत १४ लाख रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान झाले असून या रोगाचा विळखा झपाट्याने पडत आहे. कर्करोग हे जगातील मृत्यूचे दुसरे कारण आहे. कर्करोगाची संभाव्य लक्षणे प्राथमिक अवस्थेत सापडली तर कर्करोग बरा होऊ शकतो. त्यासाठी वयाची चाळीशी पार केल्यावर प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा तरी सोनोग्राफी करून घेणे जरुरीचे आहे, असा सल्ला व्हिक्टर हॉस्पिटलचे कर्करोग विशेषतज्ज्ञ डॉ. अविनाश आनंद यांनी मडगाव रवींद्र भवनच्या परिषदगृहात व्याख्यानात दिला.

श्री गजानन महाराज ट्रस्ट, श्री हरी मंदिर देवस्थान मडगाव, श्री दुर्गा माता मंदिर आणि व्हिक्टर कॅन्सर केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जागृतीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. जोस अल्वारीस, गजानन महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष गिरीश केणी, हरिमंदिर देवस्थान मडगावचे अध्यक्ष सुहास कामत, दयानंद चोडणकर यांची उपस्थिती होती.


अति थकवा येणे, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, त्वचेच्या रंगामध्ये बदल होणे, छातीत किंवा स्तनामध्ये गाठ आढळणे, सततचा खोकला, कफ किंवा श्वास घेण्यास त्रास, शरीराच्या कुठल्याही भागातून सतत रक्तस्त्राव, अन्न गिळण्यास त्रास होणे, जखम लवकर बरी न होणे, सतत अपचन किंवा अस्वस्थता वाटणे, सततची बद्धकोष्ठता तसेच अनुवंशिकता ही सर्व कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे ते पुढे म्हणाले.

दुसर्‍या सत्रात गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. जोस अल्वारीस यांनी पोट आणि आतड्यासंबंधी होणार्‍या कर्करोगाची माहिती दिली. तंबाखू, गुटखा, मद्य, धूम्रपान, मीठ यांचा अतिवापर, मनावर अति ताण घेणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, अति प्रमाणात मांस सेवन, प्रदूषित वातावरण, असुरक्षित लैंगिक संबंध, तीव्र सूर्यप्रकाशात जास्त वेळ रहाणे, जंक फूडचा अतिवापर यामुळे कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

सुहास कामत आणि आदेश कारवारकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन गिरीश केणी तर, आभार दयानंद चोडणकर यांनी मानले.