शिरगाव लईराई जत्रा १२ मेपासून; तयारीला सुरुवात

देवस्थान समिती, प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 12:06 am
शिरगाव लईराई जत्रा १२ मेपासून; तयारीला सुरुवात

डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोवा तसेच इतर राज्यातही प्रसिद्ध असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईचा प्रसिद्ध जत्रोत्सव १२ मे पासून सुरू होणार आहे. पाच दिवस भाविकांचा महापूर या ठिकाणी लोटणार आहे.

देवस्थान समिती प्रशासन व इतर माध्यमातून शिरगावात जत्रेच्या तयारीला वेग आलेला असून घरोघरी रंगरंगोटी, सजावट, कमानी उभारणे तसेच दुकाने लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक जत्रोत्सवात पाच दिवस हजेरी लावत असल्याने त्यांची चोख व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना व जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी दिली.

प्रशासनाने वाहतूक, पाणी व्यवस्था तसेच पार्किंग व्यवस्था, गर्दी टाळून योग्य पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी आढावा बैठक घेतली आहे. भाविकांनी देवस्थान समिती व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन गणेश गावकर यांनी केले आहे.

राज्यात ठिकठिकाणी हजारो व्रतस्थ धोंड ७ मेपासून व्रत सुरू करणार आहेत. काही पाच दिवस तर काही तीन दिवस व्रत करतात.

शिरगावात तयारीला वेग आला आहे. देवीची तळी व देवस्थान परिसर स्वच्छ तसेच रंगरंगोटीसाठी सज्ज होताना दिसत आहे.

हजारो व्रतस्थ धोंड १२ रोजी मध्यरात्री अग्निदिव्य साकारतात. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. लोकांना अग्नी दिव्य प्रत्यक्षात पाहता यावे यासाठी विशेष सोय करण्यासाठी देवस्थान समिती व प्रशासनाचे पदाधिकारी कार्यरत झाले आहेत.

जत्रोत्सवात मोहरीच्या कळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने गोवा तसेच इतर राज्यातूनही शेकडो लोक मोगरी कळे विकण्यासाठी शिरगावात दाखल होत असतात. बाजारपेठेत यानिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दरवर्षी नवीन धोंड नोंदणी होत असल्याने धोंडांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन व देवस्थान समिती विशेष प्रयत्न घेत आहे. वाढती गर्मी लक्षात घेता उपाययोजना करण्यात येणार आहे. गोबी मंचुरीच्या स्टॉलना शिरगावच्या जत्रेत पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याची माहिती गणेश गावकर यांनी दिली. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे व कापडी पिशव्यांचा वापर करावा.

जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त करा : गावकर

शिरगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी गेल्या काही वर्षांपासून दुकानदारांना कागदी पिशव्या पाठवल्या आहेत. संपूर्ण जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त व्हावा यासाठी देवस्थान समिती, शाळा व्यवस्थापन तसेच इतरांनीही सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी केले.