कला अकादमीसंदर्भात मंत्री गावडेंची आज ‘पीडब्ल्यूडी’ अधिकाऱ्यांसोबत बैठक

सरकारला सादर केलेल्या अहवालावर होणार चर्चा


30th April, 12:09 am
कला अकादमीसंदर्भात मंत्री गावडेंची आज ‘पीडब्ल्यूडी’ अधिकाऱ्यांसोबत बैठक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कला अकादमीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात झाडाची पाने साचलेली होती. त्यामुळे अचानक आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. हे पाणी वाट मिळेल तसे स्लॅबमध्ये शिरल्यामुळेच सिलिंगचा एक भाग कोसळल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) सरकारला सादर केला आहे. याअनुषंगाने मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे मंगळवारी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
काहीच दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पुन्हा एकदा नूतनीकरण केलेल्या कला अकादमीच्या इमारतीला बसला. यात इमारतीच्या सिलिंगचा एक भाग कोसळला. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ‘पीडब्ल्यूडी’कडून अहवाल मागवला होता. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने सरकारला अहवाल सादर केला असून, त्यात इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात झाडांची पाने साचलेली होती. त्यामुळे अचानक आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. हे पाणी वाट मिळेल तसे स्लॅबमध्ये शिरल्यामुळेच सिलिंगचा एक भाग कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. कला अकादमीच्या इमारतीची साफसफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात झाडांच्या पानांचा कचरा साचून राहिला होता. या पानांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. हे पाणी स्लॅबमध्ये घुसल्यामुळेच सिलिंगचा एक भाग कोसळल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काहीच दिवसांपूर्वी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली होती. या सर्व विषयांवर मंगळवारच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव
नूतनीकरण केलेल्या कला अकादमीतील खुल्या सभागृहावरील छत कोसळल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर आता सिलिंगचा एक भागही कोसळला. विरोधक याला पूर्णपणे सरकारला दोषी ठरवत आहेत. मंगळवारच्या बैठकीत ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांकडून कामांची सर्व माहिती घेऊन कंत्राटदार दोषी असेल, तर त्यालाच काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचेही मंत्री गावडे यांनी सांगितले.             

हेही वाचा