क्यूआर कोड बदलून दुकानदारांना लाखोंचा गंडा

फोंडा पोलीस स्थानकात दोन तक्रारी दाखल


30th April, 12:06 am
क्यूआर कोड बदलून दुकानदारांना लाखोंचा गंडा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : सध्या दुकानदारांना क्यूआर कोड बदलून लुबाडण्याच्या प्रकाराला ऊत आला आहे. दुकानासमोर लावलेले क्यूआर कोड बदलून अनेक दुकानदारांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात दोन तक्रारी दाखल केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी तिस्क फोंडा येथे एका  दुकानदाराने  लावलेला क्यूआर कोड बदलण्यात आल्याचे उघडकीस आले होते. दुकानात खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक ऑनलाईन माध्यमातून क्यूआर कोडच्या साहाय्याने रक्कम जमा करत होते. सुमारे दोन-तीन महिन्यांनंतर बँकेत खात्याची तपासणी केली असता ग्राहकांनी जमा केलेले पैसे खात्यात जमा होत नसल्याचे दिसून आले होते. दुकानदाराने ‌बँकेत क्यूआर कोड दाखवून चौकशी केल्यानंतर कोड बदलला गेल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दुकानदारांना लाखोंचा फटका बसला होता.             

शनिवारी वारखंडे येथे एका दुकानदाराला क्यूआर कोडची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याचे समजले. दुकानदाराने दुकानातील कोडची  तपासणी केली असता कोड बदलला असल्याचे निष्पन्न झाले. कोडच्या माध्यमातून लुबाडणूक झाल्याच्या दोन तक्रारी फोंडा पोलिसांत दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता कोडच्या माध्यमातून लुबाडलेली रक्कम त्वरित वेगवेगळ्या खात्यांत जमा केली जात असल्याचे दिसून आले. संबंधित खाते इतर राज्यांत असल्याने तपासात अडथळा येत आहे. कोडच्या माध्यमातून रक्कम स्वीकारताना दुकानदाराने स्पीकर ठेवणे आवश्यक आहे. लुबाडलेल्या दुकानदारांकडे स्पीकर नसल्याचे आढळून आले आहे. अज्ञातांकडून कोड बदलण्यापूर्वी दुकानाची पाहणी केल्याचा संशय आहे. 

फोंडा परिसरात क्यूआर कोड बदलून लुबाडणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दुकानदारांनी सतर्क राहून ऑनलाईन सेवा तात्पुरती बंद केली आहे. अन्य शहरांतही असे प्रकार होत असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. दुकानदारांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधिकारी करत आहेत.

हेही वाचा