म्हापशाच्या मुख्याधिकार्‍यांकडून हुकूमशाही कारभार !

मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली कारवाईची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:25 am
म्हापशाच्या मुख्याधिकार्‍यांकडून हुकूमशाही कारभार !

म्हापशाच्या नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांच्याकडे निवेदन सादर करताना संजय बर्डे. सोबत अनिल केरकर, सचिन किटलेकर, सितेश मोरे व इतर. (उमेश झर्मेकर)

म्हापसा : येथील नगरपालिकेच्या मान्यतेशिवाय पे पार्किंग शुल्क, सोपो कर व सेनिटेशन फी हे कर लागू करण्यासह पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी हुकूमशाही कारभार चालवला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रहिवासी संजय बर्डे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रति नगरविकास मंत्री, नगरपालिका संचालनालय व म्हापसा नगराध्यक्षा यांना बर्डे यांनी सादर केल्या आहेत.
मुख्याधिकारी शेटकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरप्रकार करून पालिका मंडळाच्या ठरावाविना म्हापशातील जनतेवर वाढीव कर लादला आहे, असा आरोप बर्डे यांनी या निवेदनात केला आहे. तसेच मुख्याधिकारी शेटकर हे जनतेशी चांगले वागत नाहीत. कार्यालयात वेळेवर न येता लोकांना ताटकळत ठेवून रहिवाशांचा वेळ वाया घालवतात, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हल्लीच पे पार्किंग शुल्क, सोपो शुल्क व सेनिटेशन फी तथा कचरा करात भरमसाठ वाढ केली होती. ही कर वाढ करताना पालिका मंडळाला विश्वासात किंवा तसा ठराव घेतला गेला नव्हता. पे पार्किंगचे शुल्क २० रुपयांवर ६० रुपये केले गेले होते. शिवाय, २०२० मध्ये सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचा आधार घेत सेनिटेशन फी शुल्काच्या अंमलबजावणीचा आणखी एक बेकायदेशिररीत्या निर्णय घेतला. पालिका मंडळाला विश्वासात न घेता हा व्यावसायिक आस्थापनांवर कर लादण्यात आला.

मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर हे हुकूमशाही पद्धतीने पालिकेचा प्रशासकीय कारभार हाताळीत आहेत. तसेच शहरात बेकायदा बांधकाम व इतर अवैध कामांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे मुख्य सचिवांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची उचलबांगडी करावी. _संजय बर्डे, रहिवासी