गावसावाडा-म्हापशात शौचाचे पाणी घुसल्याने दुर्गंधी

मेगा प्रकल्पाचे बांधकाम त्वरित थांबवण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:39 am
गावसावाडा-म्हापशात शौचाचे पाणी घुसल्याने दुर्गंधी

गावसावाडा-म्हापसा येथील मेगा प्रकल्पाच्या कामावेळी सोकपीठ फुटून पायवाटेवर साचलेले सांडपाणी.

म्हापसा : गावसावाडा-म्हापसा येथे मेगा बांधकाम प्रकल्पाच्या खोदकामावेळी जुन्या बांधकामाच्या शौचालयाची सोकपीठ फुटून सर्व सांडपाणी रहिवासी क्षेत्रात गेल्याने दुर्गंधी पसरली. हे गलिच्छ पाणी दोन विहिरीत गेल्याने वाड्यावरील २०-२५ घरेही बाधित झाली आहेत.
सदर घटना मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. गावसावाडा येथील श्री औदूंबर मंदिराजवळील टेकडीवर सध्या एका मेगा इमारतीचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. त्यासाठी कंत्राटदाराने प्रकल्पाच्या नियोजित जागेतील जुनी बांधकामे पाडून खोदकाम चालू केले आहे.
या खोदकामावेळी जुन्या बांधकामाच्या शौचालयाची सोकपीठ टाकी फोडण्यात आली. त्यामुळे एखादी मुख्य जलवाहिनी फुटल्याप्रमाणे सांडपाण्याचा प्रवाह टेकडीवरून लोकवस्तीत आला. त्यामुळे वाड्यावर दुर्गंधी पसरली. या पाण्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. मंदिर परिसरातही दुर्गंधी पसरली. शिवाय, हे सांडपाणी वाड्यावरील लोक वापरत असलेल्या दोन विहिरीमध्ये मिसळल्याने सदर पिण्याचे पाणीही खराब झाले.
रहिवासी मनोज गडेकर यांनी सांगितले, सकाळी उठल्यानंतर वाड्यामध्ये अचानक दुर्गंधी पसरली. या सांडपाण्यामुळे २०-२५ घरे वापरत असलेल्या दोन विहिरी बाधित झाल्या. त्यामुळे येथील लोकांवर पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. या मेगा प्रकल्पातील फ्लॅट आणि व्हिला बिल्डर विक्री करून जातील. मात्र, त्यानंतर या सांडपाण्याचा त्रास कायमस्वरूपी रहिवाशांना होईल.
विजय भिके म्हणाले, गावसावाडा हे पूर्वी हिरवेगार क्षेत्र होते. तार ते कपेलपर्यंत मर्यादित बांधकामे होती. पण, आता या ठिकाणी मेगा प्रकल्प उभारले जात आहेत. आमचा विकासाला विरोध नाही. पण, प्रकल्पांना परवानगी देताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. ती न घेतल्यामुळेच लोकांना दुर्गंधीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.
पालिकेने प्रकल्पाचा परवाना मागे घ्यावा
गावसावाडा परिसरात अडीच-तीन मीटरचा रस्ता आहे. त्यामुळे येथे मेगा प्रकल्पाला मान्यता मिळूच शकत नाही. तरीही म्हापसा पालिका आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी मेगा प्रकल्पाला परवानगी दिली आहे. रहिवाशांना भविष्यात यामुळे समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या प्रकल्पाला माझ्यासह रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. तरीही प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून संबंधित यंत्रणा आणि म्हापसा पालिकेने या प्रकल्पाचा परवाना तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी केली आहे.