दारूच्या नशेत मामाकडून भाच्याचा खून

सांताक्रूझ-फोंडा येथील घटना : घरदुरुस्तीवरून होता वाद


30th April, 12:04 am
दारूच्या नशेत मामाकडून भाच्याचा खून

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : सांताक्रूझ-फोंडा येथे मामाने आपल्या भाच्याचा खून केल्याचे सोमवारी दुपारी उघड झाले. रविवारी मध्यरात्री दारूच्या नशेत दोघांचे भांडण झाले. यावेळी कृष्णा नाईक (६७) यांनी आपला भाचा अविनाश नाईक याच्या डोक्यावर दगड घालून खून केला. फोंडा पोलिसांनी खून प्रकरणी कृष्णा नाईक याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा ठसेतज्ज्ञांना पाचरण करून तपासणी करण्यात आली. निरीक्षक तुषार नाईक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी मामा व भाचा यांच्यात घराच्या दुरुस्तीवरून भांडण झाले होते. दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत राहत होते. दोघेही दारूच्या नशेत असताना रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास कृष्णा नाईक यांनी अविनाश नाईक यांच्या खोलीत जाऊन त्याच्या डोक्यावर दगड तसेच अन्य साहित्याने वार करून खून केला. त्यानंतर शेजारच्याच खोलीत राहणाऱ्या मामा व मामीने अविनाश नाईक याची चौकशी केली नाही.
मामा व भाचे यांच्यात वरचेवर भांडणे होत होती. अविवाहित अविनाश नाईक हा सेल्समन म्हणून फोंडा येथे काम करत होता. कृष्णा नाईक दारूच्या नशेत शेजाऱ्यांनाही शिवीगाळ करत असे. पावसाळा जवळ आल्याने घराचे छप्पर दुरुस्ती करण्यासाठी मामा आपल्या भाच्याशी वारंवार वाद घालत होता. रविवारी रात्रीही दारूच्या नशेत दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मामाने भाच्यावर हल्ला चढवून खून केल्याचे निष्पन्न झाले.
मामानेच दिली नातेवाईकांना, पोलिसांना माहिती
सोमवारी दुपारी अविनाश नाईक याच्या मामीने त्याच्या खोलीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी अविनाश नाईक हा जमिनीवर मृत अवस्थेत आढळून आला. कृष्णा नाईक याने त्वरित अविनाश नाईक याच्या विवाहित बहिणीला फोनवरून माहिती दिली. त्यानंतर फोंडा पोलिसांनाही माहिती देण्यात आली. निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रात्री उशिरा दक्षिण गोव्याच्या अधीक्षक सुनीता सावंत यांनी घटनास्थळी तपासणी केली.

हेही वाचा