वाढत्या अपघातांचे आव्हान पोलिसांनी स्वीकारावे!

डीजीपी जसपाल सिंग : ७५ पोलीस प्रशिक्षणार्थी पोलीस खात्याच्या सेवेत दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 11:35 pm
वाढत्या अपघातांचे आव्हान पोलिसांनी स्वीकारावे!

वाळपई प्रशिक्षण केंद्रातून पोलीस खात्यात रुजू झालेली पोलिसांची तुकडी. दुसऱ्या छायाचित्रात मार्गदर्शन करताना डीजीपी जसपाल सिंग.                        

वाळपई : सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणात अपघात वाढू लागले आहेत. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. समाजाकडून यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. तरीसुद्धा पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून अपघाताचे सत्र रोखण्यासाठी प्रयत्न करावा. कायद्याचे रक्षण करा. पोलीस ध्वजाचा सन्मान राखा. कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन डीजीपी जसपाल सिंग यांनी केले.
वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात ४९व्या तुकडीच्या राहिलेल्या ७५ जणांना मंगळवारी प्रामाणिक व गोपनीयतेची शपथ देऊन त्यांना खात्यामध्ये रुजू करून घेण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभात बोलताना जसपाल सिंग यांनी खाकी वर्दी अंगावर आल्यानंतर प्रत्येकाने शिस्त व कायद्याचे पालन करावे. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण होणे शक्य झाले नाही, यामुळे कोणीही खेद वाटून घेऊ नये. नव्या इच्छेने व नव्या ऊर्जेने सेवेमध्ये दाखल व्हा. आपली पात्रता सिद्ध करून दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात रस्ता अपघातांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रत्येकाने कर्तव्याचे व कायद्याचे पालन करावे. अमली पदार्थांचे सेवन ही मोठी चिंतेची बाब आहे. यासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, प्रथम स्तरावर पोलिसांची कामगिरी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करून सर्व धर्मीयांचा आदर राखा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
सर्वप्रथम पोलीस डी.जी.पी. जसपाल सिंग यांनी परेडची पाहणी केली. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्य सुचिता देसाई यांनी सर्वांना गोपनीयतेची शपथ दिली. ४९व्या तुकडीत एकूण ७५ जण अनुत्तीर्ण झाले होते. त्यांना तीन महिन्यांचा वाढीव प्रशिक्षण काळ देण्यात आला होता, तो आज संपुष्टात आला. या ७५ प्रशिक्षणार्थींमध्ये ६५ पुरुष व १० महिला भगिनींचा समावेश आहे.
यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्य सुचिता देसाई व विद्यालयातील इतर शिक्षक वर्ग, तसेच प्रशिक्षणार्थीच्या कुटुंबातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्रसंचालन अमित नाईक यांनी केले.
दहशतवादी विचार नष्ट करणे गरजेचे!
दहशतवाद हा देशासाठी मोठा धोका आहे. आपले सैनिक सीमेवर रक्षण करीत आहेत. तरीसुद्धा समाजामध्ये दडून राहिलेल्या दहशतवादी विचारांना नष्ट करून समाजात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. अशा दहशतवादी विचारांना गाडून टाका, असे आवाहन डीजीपी जसपाल सिंग यांनी यावेळी केले.