आयपीएलवर बेटिंग घेणारे १६ जण पर्वरीत अटकेत

पोलिसांच्या गुन्हा विभागाची कारवाई : १५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 12:08 am
आयपीएलवर बेटिंग घेणारे १६ जण पर्वरीत अटकेत

म्हापसा : डिफेन्स कॉलनी, पर्वरी येथील एका व्हिलावर पोलिसांच्या गुन्हा विभागाने छापा टाकून आयपीएल क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश केला. बेकायदा ऑनलाईन जुगारात गुंतलेल्या गुजरात व उत्तर प्रदेशमधील एकूण १६ जणांना अटक केली व संशयितांकडून ४६ मोबाईल, ९ लॅपटॉपसमवेत १५.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अटक केलेल्या संशयितांमध्ये विपुलकुमार ठक्कर (४५), निशांत ठक्कर (२६), हर्षिदकुमार ठक्कर (२८), सचिन ठक्कर (२९), ऋत्विक ठक्कर (२४), विशाल ठक्कर (२०), भावेश ठक्कर (४२), चिराग ठक्कर (२२), क्रिश मेहेसुरीया (२१), संजयकुमार नयी (२०), हर्ष घांची (२०), रोहनकुमार ठक्कर (२४), अल्केशकुमार वाघेला (२२), मिहीर ठक्कर (२०), विश्वासकुमार ठक्कर (२०) या सर्व रा. पाटणा उत्तर गुजरात व अमित कुमार (२५, रा. थाथी, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिसांनी रविवारी २८ रोजी रोजी रात्री इंडियन प्रिमियर लिग (आयपीएल) टी-ट्वेन्टी क्रिकेट मधील सनराईस हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स् या सामन्यादरम्यान केली. डिफेन्स कॉलनी पर्वरी येथे एका व्हिलामध्ये आयपीएलची बेटिंग सुरू असल्याची माहिती गुन्हा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृवाखाली हवालदार नित्यानंद हळर्णेकर, इश्वर कासकर, कॉन्सटेबल नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर व कमलेश धारगळकर या पथकाने हा छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांनी गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदवून सर्व संशयितांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून ९ लॅपटॉप, एक टॅबलेट, ४६ मोबाईल फोन, १२ हजार ६७० रोख रक्कम व इतर साहित्य मिळून १५ लाख १५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
भाड्याच्या व्हिलामध्ये थाटला बेटिंगचा जुगार
गेल्या २२ मार्चपासून भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळातर्फे इंडियन प्रिमीयर लीगचे आयोजन केले आहे. त्यापासून संशयित आरोपींनी वरील व्हिला भाड्याने घेऊन त्यात हा ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याचा अड्डा थाटला होता व त्यामार्फत हा बेटिंगचा जुगार चालवला जात होता.                             

हेही वाचा