गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुडीपाडव्याच्या वाहन नोंदणीत घट

पाडव्यादिवशी केवळ १२३ वाहनांची नोंदणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:33 am
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुडीपाडव्याच्या वाहन नोंदणीत घट

पणजी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुढीपाडव्यादिवशी वाहतूक खात्यात नोंद झालेल्या वाहनांत घट झाली आहे. गतवर्षी एकूण २२२ वाहनांची खात्यात नोंद झाली होती. यंदाच्या पाडव्यादिवशी मात्र १२३ वाहनांची नोंद झाल्याचे वाहतूक खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहुर्तावर वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. गोव्यातील अनेक नागरिक वाहने खरेदी करण्यासाठी दरवर्षी या सणांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या सणांच्या काळात वाहतूक खात्यात अधिकाधिक वाहनांची नोंद होत असते. परंतु, यंदा मात्र त्यात घट झालेली आहे. गेल्यावर्षी २२ मार्च रोजी गुढीपाडवा होता. या दिवशी वाहतूक खात्यात २२२ वाहनांची नोंद झाली होती. पण, यंदा मात्र पाडव्याच्या ९ एप्रिलच्या दिवशी केवळ १२३ वाहनांचीच नोंद खात्याकडे झालेली आहे. यात दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांचाही समावेश आहे.

राज्यात १२,८१,९१७ वाहने

३१ मार्च २०२४ पर्यंत राज्यात विविध प्रकारच्या एकूण १२,८१,९१७ वाहनांची नोंद झाली आहे. त्यात ५९,०८४ दुचाकी, ५५,४४७ मालवाहू वाहने, ३३,५१५ टॅक्सी, ६,१३५ बसेस, ३,७१५ रिक्षा, ७३८ ट्रॅक्टर अशा १,२९,०९२ व्यावसायिक आणि दुचाकी, कार, ट्रॅक्टर आणि इतर ११,५२,८२५ खासगी मिळून १२,८१,९१७ वाहनांची नोंदणी झालेली आहे, असेही खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.