संविधानाचा अपमान करणाऱ्यांना लोक झिडकारतील : मुख्यमंत्री

भाजपच्या मडगावातील पदयात्रेला मोठा प्रतिसाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th May, 05:08 pm
संविधानाचा अपमान करणाऱ्यांना लोक झिडकारतील : मुख्यमंत्री

मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या गोव्यात सभा झाल्या. पण काँग्रेसने गोव्याला कधीही गंभीरपणे घेतलेले नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकांवेळी एकही राष्ट्रीय नेता प्रचारासाठी आलेला नाही. हे काँग्रेसच्या नेत्यांनाही समजलेले आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला लोक जवळ करणार नाहीत. दक्षिण गोवा मतदारसंघ ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने भाजप जिंकणार, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.


लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मडगाव येथे भाजपकडून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात लोहिया मैदानावरील डॉ. लोहिया यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उमेदवार पल्लवी धेंपो, मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. पदयात्रेच्या प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकेल याचा पुनरुच्चार केला.

काँग्रेसने गोव्याला व गोव्याच्या विकासाला कधीही प्राधान्य दिलेले नाही. गोव्यातील पायाभूत सुविधा व विकास हा भाजपच्या कालावधीतच झालेला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यातील कुणीही राष्ट्रीय नेता गोव्यात प्रचारासाठी आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून राज्यातील जनतेला गृहीत धरण्यात येते व गोव्याला गंभीर घेतलेले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.


पदयात्रेला आलेला जनसमुदाय हा भाजपला मिळालेला प्रतिसाद आहे. काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा अपमान करत देशाचा, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला. हा चंद्र, सूर्य असेपर्यंत संविधान राहील, हा भाजपचा ध्यास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबाबत सर्वांना आदर आहे. त्यामुळे केवळ गोव्यातच नाही तर देशभरात याचा परिणाम होणार. गोव्यात जास्तीत जास्त मतदान होईल व मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी जनता पुढे येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२०२२ मध्ये विधानसभा निवडणुकांवेळीही राज्यात केलेल्या कामांच्या जोरावर भाजपला यश मिळालेले आहे. आतातर मोदींवरील प्रेमासाठी जनता मोठ्या मताधिक्क्याने भाजपच्या दोन्ही मतदारांना निवडून देईल. सासष्टी तालुक्यात काँग्रेसला मताधिक्क मिळायचे हा इतिहास होता, त्यावेळी आमदार दिगंबर कामत हे काँग्रेससोबत होते. मात्र, आता ते भाजपसोबत असून सासष्टीतही भाजपला मताधिक्क मिळेल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दक्षिण गोव्यातील प्रचारावेळी लोकांचा चांगला प्रतिसाद व प्रेम मिळालेले आहे. दक्षिण व उत्तर गोव्याची जागा भाजपच जिंकेल व दोन्ही ठिकाणी कमळ फुलेल. राज्यात व देशात भाजपने केलेल्या विकासकामांना लोक मतदान करतील व पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवतील, असे पल्लवी धेंपो म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती व त्यांनी केलेला विकास देशाला पाहिलेला आहे. गोमंतकीयांनीही पंतप्रधान मोदींनाच मतदान करण्याचा निश्चय केलेला आहे. या पदयात्रेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वधर्मीय जनतेचा सहभाग असून सर्वसामान्य लोकांनीही मोदींनाच पाठिंबा देण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचे आमदार दिगंबर कामत यावेळी म्हणाले.

हेही वाचा