‘काली माता’ बनलेल्या १४ वर्षांच्या मुलाने राक्षसाच्या भूमिकेतील ११ वर्षांच्या मुलाचा कापला गळ

कानपूर येथील धार्मिक कार्यक्रमातील भयंकर प्रकार; रंगमंचावरील दृश्य पाहून प्रेक्षकांचा उडाला थरकाप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 04:18 pm
‘काली माता’ बनलेल्या १४ वर्षांच्या मुलाने राक्षसाच्या भूमिकेतील ११ वर्षांच्या मुलाचा कापला गळ

कानपूर (उ. प्र.) : येथे एका धार्मिक कार्यक्रमात रंगमंचावर नाटक सादर करताना काली मातेची भूमिका करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने राक्षसाची भूमिका साकारणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाची चक्क गळा कापल्याने उपस्थितांचा थरकाप उडाला. या घटनेत मुलाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी कानपूर पोलिसांनी १४ वर्षांच्या मुलासह नाटकाचे आयोजन करणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले आहे.

कानपूरमधील बंबैयापूर गावात पौराणिक कथेचे नाटक सादर केले जात होते. त्यात देवी काली मातेची भूमिका साकारणाऱ्या १४ वर्षीय मुलाने राक्षसाची भूमिका साकारणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाच्या गळ्यावर सुरा फिरवला. यात त्या मुलाच्या गळ्यातून रक्ताच्या धारा लागल्या. रंगमंचावरील हा भयंकर प्रकार पाहून प्रेक्षकांच्या हृदयाचा धरकाप उडाा. त्यांनी वेदनेने तडफडणाऱ्या जखमी मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत त्याची उपचार सुरू करतानाच प्राणज्योत मालवली.

सुभाष सैनी यांच्या कुटुंबीयांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरी भागवत कथेचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमावेळी वरील नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. 

पोलिसांनी घटनास्थळावरून १४ वर्षांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि दुसऱ्या मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. मृत मुलाचे वडील बबलू कश्यप यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०४ अन्वये अविचारी किंवा निष्काळजी कृत्याने हत्या केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकालाही ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार त्रिवेदी यांनी दिली आहे.

हेही वाचा