संजीवनी कारखाना १०० टक्के सुरू करणारच : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आश्वासन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th May, 05:07 pm
संजीवनी कारखाना १०० टक्के सुरू करणारच : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आश्वासन

दयानंदनगर- धारबांदोडा येथे कामगारांसोबत चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर.

फोंडा : संजीवनी साखर कारखाना १०० टक्के सुरू करण्यात येईल. त्यासाठी राज्यातील ऊस उत्पादकांनी ऊसाच्या पिकात वाढ करावी. कुळे येथील दूधसागर धबधब्यावरील जीप भाड्याचे दर आणि खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांच्या प्रश्नावर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

संजीवनी साखर कारखान्याजवळ आज दुपारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक झाली. त्या बैठकीत आमदार गणेश गावकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, सरपंच बालाजी उर्फ विनायक गावस, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुधा गावकर, संजीवनी साखर कारखान्याचे कामगार, जीप मालक तसेच ट्रक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजीवनी साखर कारखाना निश्चित सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगार तसेच ऊस  उत्पादकांनी भीती बाळगू नये. राज्यातील ऊसाच्या पिकात भरमसाठ वाढ करण्याचा प्रयत्न झाला पाहिजेत. म्हणून पुढील हंगामात राज्यातील सगळा ऊस कारखान्यात स्वीकारला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या जीप व्यवसायमुळे मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे. स्थितीत बदल न केल्यास आणखी ५ वर्षांनंतर व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी सरकारने खास २३ कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु प्रकरण न्यायालयात गेल्याने सध्या काम बंद ठेवण्यात आले आहे. दरवाढीसंबंधी अावश्यक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दरासंबंधी निर्णय घेतला नसल्याने जीप मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरवाढीमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा गंभीर परिणाम जीप मालकांवर होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जर ठोस निर्णय जाहीर न केल्यास जीप मालक अधिक संकटात येतील, अशी माहिती जीप मालक नीलेश वेळीप यांनी दिली आहे.

हेही वाचा