नगरसेवकाने हरकत घेतल्यानंतर म्हापसा पालिकेत स्वीकारले धनादेश

कराची रक्कम जमा करण्याबाबत कर विभागाचा आडमुठेपणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 11:59 pm
नगरसेवकाने हरकत घेतल्यानंतर म्हापसा पालिकेत स्वीकारले धनादेश

म्हापसा : येथील पालिकेच्या कर विभागाने कराची रक्कम जमा करण्यासाठी धनादेश (चेक) स्वीकारला जाणार नाही, या जारी केलेल्या आदेशाला एका नगरसेवकाने आक्षेप घेतल्यानंतर विभागाने परस्पर घेतलेला हा आदेश मागे घेतला. यावरून म्हापसा पालिकेचे कर्मचारी जनतेला सेवा देतात की त्रास देण्यासाठी कार्यरत आहेत, असा सवाल सत्ताधारी गटातील नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी उपस्थित केला आहे.
हल्लीच पालिकेच्या लेखा विभागाकडून कराची रक्कम फक्त रोख, कार्ड आणि डिमांड ड्राफ्टद्वारेच जमा करून घेतली जाईल, असा आदेश जारी केला होता व तशी नोटीस कॅश काऊंटरवर लावली होती. धनादेश नाकारले जात होते. त्यामुळे धनादेशांद्वारे कर जमा करण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना माघारी परतावे लागत होते व त्यांना बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट घ्यावा लागत होता.
याबाबतीत व्यावसायिकांकडून नगरसेवकांकडे तक्रारी केल्या जात होत्या, अशाच तक्रारी नगरसेवक खोर्जुवेकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी २६ रोजी ते आपल्या व्यवसायाचा कर जमा करण्यासाठी पालिकेत धनादेश घेऊन गेले असता, त्यांना धनादेश स्वीकारला जात नसल्याचे कॅश काऊंटरवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
धनादेश न स्वीकारण्यामागचे कारण लिखित स्वरूपात देण्यास या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. धनादेश हा negotiable instrument आहे, त्यामुळे तो नाकारता येत नाही व या प्रकाराविरुद्ध आम्ही तक्रार करू शकतो. तसेच पालिका मंडळ किंवा मुख्याधिकाऱ्यांनी असा आदेश देऊन लोकांना त्रास देण्यास सांगितले आहे का, असा सवाल खोर्जुवेकर यांनी करताच सदर कर्मचारी निरुत्तर झाले. त्यानंतर खोर्जुवेकर यांनी हा प्रकार नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या तसेच मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या कानी घातला. मुख्याधिकाऱ्यांनी आपण असा कोणताही आदेश जारी केलेला नाही, असे सांगून पालिका लेखापाल स्मिता फळदेसाई यांना याचा जाब विचारला.
धनादेश बाऊन्स होतात, त्यामुळे आम्ही ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तर देताच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष हे त्यांच्यावर भडकले आणि तत्काळ धनादेश स्वीकारण्याचा आदेश कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्देश त्यांनी फळदेसाई यांना दिले. त्यानंतर संध्याकाळी कर विभागाने धनादेश स्वीकारण्यास सुरुवात केली, पण काऊंटरवर लावण्यात आलेला आदेश फलक मात्र हटविलेला नव्हता.

पालिका प्रशासनात ताळमेळ नाही : खोर्जुवेकर
चार पाच धनादेश बाऊन्स होत असल्यास त्यावर कायदेशीर प्रक्रिया करता येते. धनादेश स्वीकारण्यास नकार देणे, हा त्यावर उपाय नाही. पालिका मंडळ आणि मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाविना परस्पर बेकायदेशीर निर्णय घेणे योग्य नव्हे. पालिका कर्मचारी हे जनतेला सेवा देण्यासाठी असतात, त्रास देण्यासाठी नव्हे. जर लोकांना चांगली सेवा देता येत नसेल तर त्यांनी नोकरी सोडून घरी जावे. पालिकेच्या प्रशासकीय कारभारात ताळमेळ राहिलेला नाही, असा आरोप नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी केला.

पालिकेच्या कर विभागाकडून धनादेश स्वीकारले जात नाहीत, याचा करदात्यांना त्रास होत असल्याचा प्रकार नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी आमच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर लेखापालांकडून स्पष्टीकरण घेत मुख्याधिकाऱ्यांनी धनादेश स्वीकारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कॅश काऊंटरवर धानादेश स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
- डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्ष