इतिहासात २१ स्वातंत्र्य सैनिकांसह तीन साहित्यिकांनी लढवली लोकसभा निवडणूक

जनार्दन शिंक्रे सर्वाधिक सातवेळा रिंगणात; १९९९ नंतर राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:39 am
इतिहासात २१ स्वातंत्र्य सैनिकांसह तीन साहित्यिकांनी लढवली लोकसभा निवडणूक

पणजी : राज्यात १९६३ ते १९९९ या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात २१ स्वातंत्र्य सैनिकांसह तीन साहित्यिकही विविध पक्षांमार्फत उतरले होते. १९९९ नंतर मात्र एकही स्वातंत्र्य सैनिक किंवा साहित्यिकाने लोकसभेची निवडणूक लढवली नाही.

१९९९ पूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये विचारवंत असलेल्या स्वातंत्र्य सैनिक तसेच साहित्यिकांना निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवण्यात विविध राजकीय पक्षांना रस होता. गोव्याच्या भूमीतील पहिला स्था​निक पक्ष असलेल्या मगो पक्षाने १९९९ पूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि साहित्यिकांना उमेदवारी दिली होती. त्यानंतरच्या काळात मात्र राजकीय पक्षांनी स्वातंत्र्य सैनिक आणि साहित्यिकांकडे दुर्लक्ष करीत पैसा, प्रतिष्ठा आणि जिंकून येण्याची पात्रता असे तीन निकष लक्षात घेऊन उमेदवारी देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, १९९९ पूर्वी ज्या २१ स्वातंत्र्य सैनिक आणि तीन साहित्यिकांनी लोकसभा निवडणुका लढवल्या, त्यात सर्वाधिक सात निवडणुका जनार्दन शिंक्रे यांनी लढवल्या. त्यानंतर थॉमस डायस यांनी सहा निवडणुका लढवल्या. फेलिक्स रॉड्रिग्स आणि पुरुषोत्तम काकोडकर तीनवेळा, पीटर अल्वारीस, नारायण राव आणि शिवाजी देसाई प्रत्येकी दोनवेळा निवडणुकीस सामोरे गेले. तर, इतरांनी मात्र एकेकदाच नशीब आजमावले. त्या काळात शंकर भंडारी, मनोहरराय सरदेसाई आणि रवींद्र केळेकर या थोर साहित्यिकांनीही लोकसभा निवडणूक लढवली. यात केळेकर यांनी दोनदा निवडणूक लढवली. इतर दोघांनी मात्र एकेकदाच निवडणूक लढवण्यास पसंती दिली.