दहाव्या आयएसएल ट्रॉफीवर मुंबईची मोहोर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th May, 10:51 pm
दहाव्या आयएसएल ट्रॉफीवर मुंबईची मोहोर

कोलकाता : गतविजेता मोहन बागान सुपर जायंटवर ३-१ असा विजय मिळवत मुंबई सिटी एफसीने दहाव्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम फेरीत शनिवारी ०-१ अशा पिछाडीनंतर उत्तरार्धात ३ गोल करताना माजी विजेत्यांनी अविस्मरणीय विजयाची नोंद केली. मुंबई सिटी एफसीचे हे दुसरे आयएसएल जेतेपद आहे.

कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर ४४व्या मिनिटाला गोल करताना यजमानांनी आघाडी राखली. मात्र, उत्तरार्धाच्या सुरुवातीला बरोबरी साधली. शेवटच्या १६ मिनिटांत दोन गोल करताना माजी विजेत्यांनी ३-१ अशा फरकाने दिमाखात ट्रॉफी उंचावली.

जॉर्ज परेरा डियाझ, बिपीन सिंग आणि जाकुब व्होजटस त्यांच्या फायनल विजयाचे शिल्पकार ठरले. २०२१-२२ नंतर मुंबई सिटी एफसीने पुन्हा जेतेपदाला गवसणी घातली. तसेच २०२३-२४ शील्ड लीगच्या निर्णायक लढतीतील पराभवाचा सव्याज वचपा काढला.

आयएसएल २०२३-२४ पुरस्कार

गोल्डन ग्लोव्ह : फुरबा लचेंपा (मुंबई सिटी एफसी)

गोल्डन बूट : दिमित्रीओस डायमंटाकोस (केरळ ब्लास्टर्स एफसी)

उदयोन्मुख खेळाडू : विक्रम प्रताप सिंग (मुंबई सिटी एफसी)

सर्वोत्तम खेळाडू : दिमित्रीओस पेट्राटोस (मोहन बागान सुपर जायंट)