एचडी रेवण्णाना अटक; पीडित अपहरणप्रकरणी कारवाई

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th May, 10:53 pm
एचडी रेवण्णाना अटक; पीडित अपहरणप्रकरणी कारवाई

बंगळुरू : लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणाऱ्या प्रज्वल रेवण्णा यांचे वडील जेडी(एस) आमदार एचडी रेवण्णा यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर एसआयटीने त्यांना ताब्यात घेतले आहे.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल हा हसनमधून भाजप-जेडी(एस) युतीचा उमेदवार होता. २६ एप्रिल रोजी येथे मतदान झाले. अलीकडच्या काळात प्रज्वल रेवण्णा याच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती.

गेल्या गुरुवारी म्हैसूरमध्ये एका महिलेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती महिलाही लैंगिक शोषणाची बळी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रेवण्णाचा खास सतीश बबन्ना याला अटक केली. आता एसआयटीने दोन वेळा नोटीस देऊनही हजर न झाल्याने रेवण्णाला अटक करण्यात आली आहे.

होलेनरसीपूरचे खासदार एचडी रेवण्णा १९९४ मध्ये या जागेवरून पहिल्यांदा आमदार झाले. १९९९ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र २००४ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. २०१८ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाले. २०२३ मध्येही ते जिंकले, पण त्यांचा पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. त्याच वेळी, प्रज्वल २०१९ मध्ये पहिल्यांदा खासदार झाला. तो दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून, दोघांविरुद्ध दुसऱ्यांदा लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यानंतर एचडी रेवण्णाना ताब्यात घेण्यात आले. मात्र, मुलगा प्रज्वलचा शोध सुरू आहे. प्रज्वल याने अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवण्णा यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांच्यावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल देशाबाहेर पळून गेला आहे. तो जर्मनीत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा