झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीचे तिकीट

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
25th April, 08:49 pm
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीचे तिकीट

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने त्यांना गांडेय विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

निवडणुकीच्या रॅलीत त्या दिसल्या असल्या तरी निवडणुकीच्या राजकारणातही त्या उतरणार की नाही, याची जोरदार चर्चा होती. आता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. या जागेवर २० मे रोजी मतदान होणार आहे.

काय म्हणाले जेएमएम?

जेएमएमने म्हटले आहे की, "लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ आणि गांडेय विधानसभा पोटनिवडणूक २०२४ मधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. समीर मोहंती जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कल्पना सोरेन यांना गांडेय विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

नावाची घोषणा होण्यापूर्वीच कल्पना सोरेन यांनी गांडेय जागेसाठी तयारी सुरू केली होती. ही जागा झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यांतर्गत येते. नुकतेच कल्पना यांनी तेथे जेएमएम कार्यकर्ता परिषदेलाही संबोधित केले होते.

हेमंत सोरेन यांना अटक होण्यापूर्वीच कल्पना सोरेन यांचे नाव झारखंडच्या राजकारणात गाजले होते. हेमंत सोरेन यांना ईडी अटक करण्याची शक्यता होती तेव्हा त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. त्या सभेतील कल्पना सोरेन यांचा फोटो व्हायरल झाला होता.