मतदान आले, जागे व्हा !

मंगळवारी ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदानात सहभाग न घेणारे नंतर पाच वर्षे सरकारवर कडाडून टीका करत असतात. झोपेचे सोंग घेऊन राहण्यापेक्षा जागलेपणाची भूमिका घ्या. मतदानात सहभाग घेऊन आपल्याला हवा तो बदल करा. शंभर टक्के मतदान होत नाही. दरवेळी तीस ते चाळीस टक्के लोक मतदानाकडे पाठ फिरवतात. मतदानाच्या सुट्टीचा फायदा घेऊन लाखो मतदार सहली, देवदर्शनाला जातात. देवदर्शन आधीही करता येते. सहलीला नंतर कधीही जाता येईल. पण मतदान त्याच दिवशी करा. मतदान चुकवल्यामुळे सगळी गणिते चुकतात. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानात सक्रियपणे सहभागी व्हा. मत कोणालाही द्या पण मतदान चुकवू नका.

Story: उतारा |
05th May, 06:19 am
मतदान आले, जागे व्हा !


लोकसभा निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी गोव्यात मतदान होईल. जिंकण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न उमेदवार आणि राजकीय पक्ष करत आहेत. बहुतेक ठिकाणी मतदार स्पष्टपणे उमेदवारांविषयी आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी मतदार कमालीचे शांत आहेत. राजकीय पक्षांची एक गोष्ट यावेळी दिसत आहे ती म्हणजे जिथे मतदान खात्रीने होणार आहे त्या भागांतील प्रचारावर पक्षांनी भर दिला आहे. महत्त्वाच्या पक्षांच्या उमेदवारांना आपल्याला अमुक ठिकाणीच जास्त मतदान होईल असे दिसते, त्या भागांतील प्रचारावर त्यांनी जास्त लक्ष दिले आहे. प्रत्येकाने आपले मतदार कोण ते जवळ जवळ निश्चित केले आहे. भाजपने आपले पारंपरिक मतदार दूर जाऊ नयेत म्हणून काळजी घेतली आहे, तर काँग्रेसने आपल्या जुन्या मतदारांना साकडे घातले आहे.

भाजपकडून दुखावलेल्या मतदारांवर काँग्रेसने अधिक लक्ष दिले असून वेगवेगळ्या समाजाच्या मतांवर काँग्रेस आणि भाजपनेही लक्ष केंद्रीत केले आहे. वेगवेगळे समाज आणि वेगवेगळ्या धर्मांतील मतांवर काही राजकीय पक्षांचे नेहमी लक्ष असते. यावेळीही ते स्पष्टपणे दिसत आहे. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सने (आरजीपी) टॅक्सी चालक, समस्याग्रस्त गावे, मार्केट अशी ठिकाणे हेरून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गेल्या दोन-तीन निवडणुकांपेक्षा यावेळची लोकसभा निवडणूक चुरशीची आणि तेवढीच लक्षवेधी ठरली आहे.

सत्ताधारी भाजपने उत्तरेत मतदारांची नाराजी असतानाही श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली. श्रीपाद नाईक यांना उमेदवारी न दिल्यास पक्षाला नुकसान होईल असे समजून भाजपने त्यांनाच पुन्हा संधी दिली. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली. खलप हे गोव्यातील अभ्यासू राजकारण्यांपैकी एक. गोव्यात सध्या दीड लाख लोकांना मासिक मानधन देणारी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणण्याचे श्रेय पर्रीकरांइतकेच खलप यांनाही जाते. गेली वीस-बावीस वर्षे ते सक्रिय राजकारणात नसले तरी श्रीपाद नाईक यांना टक्कर देण्यासाठी खलप हेच चांगले उमेदवार ठरू शकतात असे काँग्रेस श्रेष्ठींना वाटले. त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली गेली. भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्याविषयी चांगले बोलणारे मतदार सापडणे कठीण आहे. दहापैकी नऊ लोक त्यांच्याविरोधात बोलतात असे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी भाजपकडे केडर आहे, सत्ता आहे, काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आहे. भाजपने मोदी, अमित शहा यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभा लावल्या. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी सर्व ते उपाय केले. जाहिराती, सोशल मीडियाचा वापर अशा सगळ्या गोष्टींवर भाजपने खर्च चालवला आहे. काँग्रेस जनतेच्या भरवशावर आहे. शेवटच्या क्षणी काही सभा होत आहेत. पण पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. काही सभा होताहेत पण या शेवटच्या क्षणाच्या सभा काँग्रेसला किती मदतीच्या ठरतील ते पहावे लागेल. उत्तरेत पाचवेळा निवडून येऊन विक्रम करणारे श्रीपाद नाईक सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात एकदाच लोकसभेवर निवडून गेलेले आणि आपल्या त्याच एका टर्ममध्ये देशाचे कायदा मंत्री राहिलेले रमाकांत खलप आहेत.

तिसरे महत्त्वाचे उमेदवार आहेत आरजीपीचे मनोज परब. गोव्यात काही वर्षांपूर्वी काही तरुणांना एकत्र करून रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवून आरजीपीने ९.८१ टक्के मते मिळवली. गोवा फॉरवर्ड, तृणमूल, आप, मगो, राष्ट्रवादी यांच्यापेक्षा आरजीपीने जास्त मते मिळवली. आरजीपीला मिळालेली मते म्हणजे वेगवेगळ्या पक्षांना कंटाळून त्यांच्याकडे आलेला मतदार आहे. त्यात नवमतदारही मोठ्या प्रमाणात आहे. ती मते आपल्याकडे ठेवण्यासाठी आरजीपीने लोकसभेतही उमेदवार उतरवले. पक्षाचे प्रमुख मनोज परब यांना उत्तरेतून तर रुबर्ट परेरा यांना दक्षिणेतून उमेदवारी दिली आहे. आरजीपीने इंडिया गटासोबत जाणे अनेकांना अपेक्षित होते, पण इंडिया गटाच्या नेत्यांकडून ही प्रक्रिया वेळेत झाली नाही. आरजीपीने या निवडणुकीत काँग्रेसचा घास पुन्हा हिसकावला तर मात्र इंडिया गटाला त्याचा पश्चाताप होणार आहे. २०२२ मध्ये आरजीपीचा सर्वांत मोठा फटका काँग्रेसलाच बसला होता.

दक्षिण गोव्यात भाजपने आधी ज्या दोन-तीन उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते, त्यांना बाजूला करून महिला उमेदवाराला निवडणुकीत उतरवले. भाजपने असा प्रयोग प्रथमच केला आहे. देशातील आतापर्यंतच्या टप्प्यांतील निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून पल्लवी धेंपोंचा उल्लेख होतो. त्यामुळे दक्षिण गोव्यातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ही बातमी दिल्यामुळे त्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष आहे. काँग्रेसनेही दक्षिण गोव्यात चांगला पर्याय दिला आहे. नौदलाचे माजी अधिकारी आणि कारगील युद्धातही ज्यांनी योगदान दिले अशा विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरियातो यांनी संविधान गोव्यावर लादल्याचे एक विधान केल्यामुळे देशभर त्यांचेही नाव गेले. जसे पल्लवी धेंपो देशात सर्वात श्रीमंत म्हणून त्यांच्याकडे लक्ष आहे तसेच विरियातो यांनी केलेल्या विधानामुळे देशभरातील प्रसारमाध्यमे त्यांच्याकडेही लक्ष ठेवून आहेत. गोव्यातील एका मतदारसंघातील भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडे देशातील प्रसारमाध्यमांचे लक्ष आहे, असे प्रथमच झाले आहे. आरजीपीने रुबर्ट परेरा या तरुण उमेदवाराला निवडणुकीत उतरवले आहे. रुबर्टने जास्त मते मिळवली तर काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो. त्यासाठी इंडिया आघाडीने निवडणुकीपूर्वीच चर्चा करून आरजीपीला आघाडीत घेतले असते तर ही निवडणूक काँग्रेससाठी लाभदायक ठरली असती.

गोव्यातील चित्र पाहून एका गोष्टीची खात्री वाटते ती म्हणजे काँग्रेसने गोव्यातील जागा गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. भाजप आणि आरजीपी जेवढे कार्यकर्ते घेऊन प्रचार करीत आहे, तेवढे कार्यकर्तेही काँग्रेसकडे दिसत नाहीत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रचार गांभीर्याने घेतला आहे असे दिसत नाही. काही नेत्यांचे आतून काहीतरी वेगळेच सुरू असल्याचे दिसत आहे. मतमोजणीवेळी कोण कुठे होता ते स्पष्ट होणार आहे. पण काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांनीही लक्ष दिलेले नाही. एकही स्टार नेता आतापर्यंत गोव्यात प्रचारासाठी आलेला नाही. यावरून काँग्रेसने गोव्यातील जागांकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल. कारण उमेदवार जाहीर करण्यातही काँग्रेसने बराच वेळ काढला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच दिवस असताना काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने तोपर्यंत प्रचाराची एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी सुरू केली होती. प्रचारात नसलेले गांभीर्य हेही काँग्रेसला नडू शकते.

राजकीय पक्षांना महत्त्वाचे तालुके

उत्तर गोव्यात ५,८०,५७२ मतदार आहेत, तर दक्षिण गोव्यात ५,९८,७६७ मतदार आहेत. विशेष म्हणजे लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये म्हणजेच उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार तालुके फार महत्त्वाचे आहेत. उत्तर गोव्यात बार्देशमध्ये सात मतदारसंघांमध्ये एकूण १,९९,०५५ मतदार आहेत. तर दक्षिण गोव्यात येणाऱ्या सासष्टीतील आठ मतदारसंघांमध्ये २,३९,८३७ मतदार आहेत. उत्तरेत तिसवाडीत पाच मतदारसंघांमध्ये १,३१,३९१ मतदार आहेत तर दक्षिणेत मुरगावमधील चार मतदारसंघांमध्ये १,१४,८०४ मतदार आहेत.

दक्षिण गोवा

दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. त्यात नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी व वेळ्ळी यांचा समावेश आहे. सासष्टीतील या मतदारसंघांमधील सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयाच्या फार जवळ असतो. दक्षिण गोव्याच्या राजकारणात सासष्टीला फार महत्त्व आहे. युगोडेपानंतर काँग्रेसने हा तालुका आपल्या जवळ ठेवला. पण सध्या भाजप, आप, गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व अपक्ष अशा सर्वांचीच तिथे चलती आहे. चार राजकीय पक्ष आणि एक अपक्ष असलेल्या या तालुक्यातील मते यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कशी विभागली जातात त्यावर सारे गणित अवलंबून आहे. भाजपमध्ये आलेले दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह भाजप सरकारला पाठिंबा दिलेले आलेक्स रेजिनाल्ड, नावेलीतून भाजपच्या उमेदवारीवर जिंकलेले उल्हास नाईक तुयेकर हे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला आघाडी देऊ शकतील की विजय सरेदसाई, युरी आलेमाव, व्हेंझी व्हिएगश, क्रुझ सिल्वा इंडिया गटाच्या उमेदवाराला आघाडी देतील ते पहावे लागेल. जो सासष्टीत आघाडी घेईल तो वर म्हटल्याप्रमाणे विजयाच्या जवळ जाईल. सासष्टीतील आठ मतदारसंघांमध्ये २,३९,८३९ मतदार आहेत ज्यात आकड्यांप्रमाणे जास्त मतदार ख्रिस्ती धर्मीय आहेत. त्यानंतर हिंदू आणि शेवटी क्रमांक लागतो मुस्लिम मतदारांचा.

ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांच्या ‘डबल इंजिन’ या पुस्तकातील एका उल्लेखानुसार सासष्टीत २०१९ मध्ये हिंदू मतदारांची संख्या ८६,३८७ इतकी होती. तर ख्रिस्ती मतदारांची संख्या १,२६,४३३ होती. २०१७ च्या तुलनेत ख्रिस्ती मतदारांची संख्या १५ हजारांनी घटली होती. भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात जाणाऱ्या गोमंतकीयांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. यात सर्वाधिक नागरिक सासष्टीतील आहेत. त्याचा परिमाण मतदार यादीवर होतो. म्हणून मतदारांची संख्या घटत आहे. विशेषतः ख्रिस्ती मतदारांची संख्या कमी होत आहे, त्याचे मुख्य कारण हेच आहे. २०१७ आणि २०१९ या दोनवेळच्या मतदारांमध्ये मोठा फरक दिसतो. पण यावेळी सासष्टीतील मतदारांमध्ये मोठा फरक दिसलेला नाही. कुठल्या मतदारांची संख्या कमी झाली आहे ते धर्मनिहाय्य मतदारांची संख्या तपासल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

दक्षिण गोव्यात दुसरा तालुका जास्त मतदारांचा आहे तो म्हणजे मुरगाव. मुरगावमध्ये चार मतदारसंघ आहेत. या चार मतदारसंघांमध्ये १,१४,८०४ मतदार आहेत. तेथील तीन आमदार भाजपसोबत आहेत तर एका अपक्षाचा भाजपलाच पाठिंबा आहे. मंत्री मॉविन गुदिन्हो आणि कृष्णा साळकर हे भाजपच्या उमेदवारीवर जिंकून आलेले, तर संकल्प आमोणकर काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून नंतर भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. राहता राहिले अपक्ष आमदार आंतोन वाझ. सगळेच भाजपसोबत असले तरी तेथील मतांची विभागणी कशी होते ते मतमोजणीनंतर कळेल. फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघांमध्ये ९०,८५४ मते आहेत. फोंड्याचे आमदार रवी नाईक, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर तसेच मगोचे मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हेही भाजपसोबत आहेत. ढवळीकर यांनी २०१९ मध्ये भाजपला सहकार्य केले नाही. सासष्टीतील काही मते तसेच ढवळीकरांचे सहकार्य नसल्यामुळे नरेंद्र सावईकरांना त्यावेळी पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ते भाजपसोबत आहेत. सावर्डे, सांगे, कुडचडे, केपे आणि काणकोण या पाच मतदारसंघांमध्ये १,५३,२७२ मतदार आहेत. एल्टन डिकॉस्टा हे केपेचे आमदार काँग्रेसचे आहेत. सावर्डेत गणेश गावकर, कुडचडेत नीलेश काब्राल, सांगेत सुभाष फळदेसाई आणि काणकोणात रमेश तवडकर हे भाजपचे आमदार असल्यामुळे या चार मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी घेण्याची संधी आहे. काँग्रेसला केपेमध्ये आघाडी मिळू शकते. काँग्रेसला ज्या प्रकारे मडगाव, फातोर्डा, नुवे, कुडतरी, बाणावली, वेळ्ळी, कुंकळ्ळी, केपे या मतदारसंघांमध्ये चांगल्या प्रमाणात मते मिळू शकतात, त्याचप्रमाणे काणकोण, शिरोडा, सांगे, फोंडा मतदारसंघांमध्येही चांगल्या प्रमाणात मते मिळू शकतात.

उत्तर गोवा

उत्तर गोव्यात भाजपने सत्तरी तालुक्यातील पर्ये आणि वाळपई मतदारसंघांवर आधीच आपला हक्क सांगितला आहे. तेथे काँग्रेसपेक्षा आरजीपी जास्त मते मिळवू शकतो. सत्तरीतील या दोन मतदारसंघांमध्ये ६६,२३६ मतदार आहेत. डिचोली तालुका हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तालुका. तेथे साखळी, मये आणि डिचोली या तीन मतदारसंघांमध्ये ८५,९८६ मतदार आहेत. साखळीत डॉ. प्रमोद सावंत, मयेत प्रेमेंद्र शेट हे भाजपचे आमदार आहेत. तर डिचोलीत अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये यांचा भाजप सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे डिचोली तालुक्यातही काँग्रेसपेक्षा भाजपला जास्त चांगले वातावरण आहे. या तालुक्यात भंडारी समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ते यावेळी काय भूमिका बजावतात त्यावरही गणित अवलंबून आहे. त्यांच्या अस्वस्थतेचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. पुढे बार्देशमध्ये सात मतदारसंघांमध्ये १,९९,०५५ मतदार आहेत. तिथल्या किनारी भागात कळंगुट, साळगाव, शिवोली सारख्या मतदारसंघांमध्ये भाजप, आरजीपी आणि काँग्रेस यांच्यात मतांची विभागणी होऊ शकते. काँग्रेसचे उमेदवार राहतात म्हापशात. त्यामुळे म्हापशात आणि आमदार कार्लुस फेरेरा यांच्यामुळे हळदोण्यात काँग्रेसला चांगली मते मिळू शकतात. पर्वरीमध्ये पुन्हा भाजपला मतांची आघाडी मिळू शकते. तिसवाडीतील पाच मतदारसंघांमध्ये १,३१,३९१ मतदार आहेत. पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, कुंभारजुवे या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. पण बार्देशप्रमाणे तिसवाडीत ख्रिस्ती मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात मतांची विभागणी होऊ शकेल. सांतआंद्रेत विरेश बोरकर हे आरजीपीचे आमदार आहेत. आमदार म्हणून विरेश बोरकर कायम सक्रिय असतात. त्यामुळे आरजीपी, भाजप आणि काँग्रेस अशी मतांची विभागणी तेथे होईल. पण तेथे जास्त फायदा आरजीपीला मिळू शकतो.

मंगळवारी ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदानात सहभाग न घेणारे नंतर पाच वर्षे सरकारवर कडाडून टीका करत असतात. झोपेचे सोंग घेऊन राहण्यापेक्षा जागलेपणाची भूमिका घ्या. मतदानात सहभाग घेऊन आपल्याला हवा तो बदल करा. शंभर टक्के मतदान होत नाही. दरवेळी तीस ते चाळीस टक्के लोक मतदानाकडे पाठ फिरवतात. मतदानाच्या सुट्टीचा फायदा घेऊन लाखो मतदार सहली, देवदर्शनाला जातात. देवदर्शन आधीही करता येते. सहलीला नंतर कधीही जाता येईल. पण मतदान त्याच दिवशी करा. मतदान चुकवल्यामुळे सगळी गणिते चुकतात. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानात सक्रियपणे सहभागी व्हा. मत कोणालाही द्या पण मतदान चुकवू नका.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.

मो. ९७६३१०६३००