मतदान करुया… लोकशाहीच्या मजबूतीसाठी

मतदाराने चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. भूलभुलैयाला बळी पडू नये. सदसद्विवेक बुद्धीचा वापर करावा. येणाऱ्या भविष्याचा अंदाज घेऊनच मतदान करणे ही काळाची गरज आहे.

Story: भवताल |
05th May, 05:17 am
मतदान करुया… लोकशाहीच्या मजबूतीसाठी

लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असलेली लोकसभेची निवडणूक ७ मे रोजी होणार आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यापासून विविध राजकीय पक्षांनी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे. गोव्यातही अशाच प्रकारचा माहोल निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक पक्ष रिंगणात उतरलेले आहेत. प्रत्येकाने मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून आपल्या प्रचाराचा माहोल तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. यामुळे या प्रयत्नांना कितपत यश येणार हे निवडणुका व त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. रविवार संध्याकाळपर्यंत सार्वजनिक प्रचाराचा धुरळा कायद्याने बंद होणार आहे. त्यानंतर गुपचूप प्रचाराची सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी मनी फॅक्टर गरजेचा आहे त्या ठिकाणी तो वापरण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून आपल्यापरीने होणार आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 

देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. जागतिक स्तरावर भारताच्या लोकशाहीला अन्यनसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक निवडणुका झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेचा आधार व सन्मान राखून हा देश सामाजिक व लोकशाही तत्त्वाने पुढे जाताना दिसत आहे. लोकशाही मजबूत व्हायची असेल तर प्रत्येकाने घटनेचा, संविधानाचा आदर करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने देश मार्गक्रमण करताना दिसत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांमध्ये अनेक राजकीय पक्षांनी सत्ता भोगली. प्रत्येकाने आपापल्यापरीने देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. भाजपा आपल्या सरकारच्या माध्यमातून देशाला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. 

यश अपयश हे फिरत्या चक्राप्रमाणे असते. आपण चांगले काम केले तर मतदार आपल्याला भरभरून प्रतिसाद देतात; मात्र फक्त निवडणुकी पुरतेच डोके वर काढले व कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केला तर मतदार बाहेर फेकतात हा नैसर्गिक नियम आहे. मात्र मतदान हा पवित्र हक्क आहे. प्रत्येकाने तो बजवावा. अनेकवेळा राजकीय क्षेत्राचा कंटाळा येत असल्यामुळे अनेक मतदार मतदान करण्यासाठी मागेपुढे करत असतात. हल्लीच्या काळात नोटाची टक्केवारी हळूहळू वाढू लागलेली आहे. एकूण आकडेवारीनुसार युवा मतदारांचा यामध्ये खास करून समावेश असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे युवा मतदार सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळलेले आहेत. ही युवा मंडळी राजकीय परिस्थितीला नकारात्मक चष्म्यातून का पाहत आहे याचा अंदाज घेणे ही प्रत्येक राजकीय पक्षाबरोबरच सरकारची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. कारण ज्यावेळी आपण देशाचे भवितव्य, देशाचे भविष्य या युवांच्या खांद्यावर आहे असे म्हणतो तर मग अशा या पवित्र हक्कापासून तरुण पिढी बाजूला राहणे हे खरोखरच येणाऱ्या काळासाठी मोठा धोका निर्माण करणारे आहे.

आज देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर आदर्शाची बनू लागलेली आहे. लोकशाहीमध्ये प्रजा हीच राजा असते यामुळे प्रजेच्या इच्छेनुसार प्रजेला हवे असलेले सरकार सत्तेवर येणे किंवा आलेल्या सरकारने त्यांच्यानुसारच कार्यभार पुढे नेणे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. प्रत्येक युवकाने किंवा असमाधानी मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक पेक्षा वैयक्तिक कामावर आजकाल जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येत आहे. यामुळे सार्वजनिक विकासाच्या बाता सोडा मला वैयक्तिक सरकारने काय दिले अशा प्रकारचा सवाल आता प्रत्येक मतदार राजकीय पक्षांना विचारू लागलेला आहे. यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्य व प्रत्येक मतदाराचा विचार लक्षात घेऊन त्यांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. मत न देणे किंवा नकारात्मक स्वरूपाचे मत देणे यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

गोव्याच्या दोन मतदारसंघासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. उत्तर गोव्यात आतापर्यंत भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीपाद नाईक यांनी पाचव्यांदा बाजी मारलेली आहे. यंदा त्यांच्यासमोर काँग्रेस पक्षाचे रमाकांत खलप यांनी कडवे आव्हान निर्माण केलेले आहे. हे कडवे आव्हान म्हणण्यापेक्षा श्रीपाद नाईक  गेल्या पाच वर्षांमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी पडलेले आहे हे मान्यच करावे लागेल कारण गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी ज्या पद्धतीने मतदार संघामध्ये काम करणे गरजेचे होते तसे काम झालेले नाही हे कटू सत्य मान्यच करावे लागेल. तरीसुद्धा भाजपाची निर्माण झालेली हवा व देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचे निर्माण झालेले चैतन्य पाहता श्रीपाद नाईक यांना यदाकदाचित विजय संपादन करता येणार. श्रीपाद नाईक यांनी येणाऱ्या काळात अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक प्रश्न हे केंद्रीय सरकारवरच अवलंबून आहेत. केंद्र सरकारचा दूत म्हणून राज्यात निवडून आलेला खासदार चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याच पद्धतीने येणाऱ्या खासदाराने काम करणे गरजेचे आहे. 

७ मे रोजी होणारी निवडणूक व त्यातून निवडून येणारा खासदार यांनी आपली जबाबदारी ओळखून येणाऱ्या काळात काम करणे गरजेचे आहे. अनेक विधानसभेतील आमदार हे सक्रिय आहेत. यामुळे खासदारापेक्षा आमदाराचे सुद्धा महत्त्व या कामी महत्त्वाचे आहे असे मानणारा सुद्धा मतदार आहे. तरीसुद्धा खासदाराकडे असलेल्या मोठ्या निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकास तो घडवून आणू शकतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. यामुळे मतदाराने चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. भूलभुलैयाला बळी पडू नये. सदसद्विवेक बुद्धीचा वापर करावा. येणाऱ्या भविष्याचा अंदाज घेऊनच मतदान करणे ही काळाची गरज आहे. 


उदय सावंत, वाळपई