मतदारांची शांतता कुणासाठी मारक ?

दक्षिण गोव्यात उमेदवाराविषयी फार नाराजी नव्हती. पण काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची भूमिका अनेक चर्चच्या धर्मगुरूंनी घेतली. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी तसा आरोपही केला. ख्रिस्ती बहुल मतदारसंघांमध्ये भाजपला असलेला विरोध उघडपणे दिसत होता. त्यामुळे मतदानापर्यंत भाजप दोन्ही ठिकाणी पराभूत होऊ शकते असेच मानले जायचे. पण शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये मतदारांमध्येही कमालीची शांतता दिसली. ती शांतता भाजपला तारणार की काँग्रेसला, ते मतमोजणीच्या दिवशी कळेल.

Story: उतारा |
12th May, 05:33 am
मतदारांची शांतता कुणासाठी मारक ?

लोकसभा निवडणुकीतून भाजपने दिलेल्या उमेदवाराविषयी उत्तरेत स्पष्ट नाराजी, तर दक्षिणेत ख्रिस्ती बहुल मतदारसंघांमध्ये भाजपविषयी नाराजी असल्याचे स्पष्ट दिसत होते. सहाव्यांदा श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे उत्तर गोव्यात उघडपणे लोक नाराजी व्यक्त करू लागले. त्याला खतपाणी मिळाले ते त्यांच्या बदल्यात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून माजी मंत्री दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केलेल्या दाव्यांमुळे. ही नाराजी इतकी वाढली की हरवळेच्या देवस्थानाच्या वादावेळीही काही भंडारी समाजाच्या नेत्यांनी श्रीपाद नाईक यांच्यावरच उघड उघड टीका केली. प्रचारा दरम्यान लोक प्रश्नांचा भडिमार करतात म्हणून अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी श्रीपाद नाईक यांना सोबत न नेता वैयक्तिक स्तरावर त्यांचा प्रचार केला. आपल्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मतदान करा, असे सांगण्याची वेळ भाजपच्या नेत्यांवर आली.

दक्षिण गोव्यात उमेदवाराविषयी फार नाराजी नव्हती. पण काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची भूमिका अनेक चर्चच्या धर्मगुरूंनी घेतली. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी तसा आरोपही केला. ख्रिस्ती बहुल मतदारसंघांमध्ये भाजपला असलेला विरोध उघडपणे दिसत होता. त्यामुळे मतदानापर्यंत भाजप दोन्ही ठिकाणी पराभूत होऊ शकते असेच मानले जायचे. पण शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये मतदारांमध्येही कमालीची शांतता दिसली. ती शांतता भाजपला तारणार की काँग्रेसला, ते मतमोजणीच्या दिवशी कळेल. पण भाजप जेवढ्या मतांची अपेक्षा धरत आहे तेवढी मते भाजपला मिळणार नाहीत. उलट आरजीपीच्या खात्यात जास्त मते जाऊ शकतात. नोटाचीही मते यावेळी वाढण्याची शक्यता आहे. एकूण काय तर काँग्रेसला लोकांमध्ये भाजपविरोधात आणि विद्यमान खासदाराविरोधात असलेला रोष मतदानामध्ये रुपांतरित करण्यात यश आल्याचे दिसत नाही. प्रचारात काँग्रेस आधीच मागे पडली होती. जाहिरातींवरही काँग्रेसने भर दिला नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट यांच्यापैकी कोणाचीच सभा घेणे काँग्रेसला शक्य झाले नाही. सभा घेतली तर हजारोंची गर्दी लागेल. गर्दी नाही झाली तर त्याचा नकारात्मक परिणाम देशभरात काँग्रेसच्या प्रचारावर होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळे कदाचित काँग्रेसने जाहीर सभा घेतली नसावी. दिल्लीतील नेत्यांचा एक व्हिडिओ संदेशही गोमंतकीय मतदारांसाठी प्रसारित करणे काँग्रेसला जमले नाही. राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर काँग्रेसचे कार्यकर्तेही नव्हते. भाजपच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी काँग्रेसने जे प्रयत्न करायला हवे ते प्रत्यक्षात दिसले नाहीत. काँग्रेसच्या ढिसाळ संघटनेचा फायदा भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना कामात जुंपून उठवण्याचा प्रयत्न निश्चितच केला आहे.

भाजपने अनेक भागांत आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी कामाला लावले. तरीही काही भागांत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही निराशा दिसली. पणजी, ताळगाव, सांताक्रुझ अशा अनेक भागांमध्ये भाजपचे कार्यकर्ते उत्साहाने काम करताना दिसले नाहीत. भाजप कार्यकर्ते जेवढ्या तळमळीने साखळी, पर्ये, वाळपई, डिचोली, पेडणे, थिवी, पर्वरी परिसरात काम करत होते तेवढी तळमळ अन्य काही मतदारसंघांमध्ये दिसली नाही. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांनी श्रीपाद नाईक यांच्यासाठी फार मेहनत घेतली नाही, असेच म्हणावे लागेल. उलट काही माजी आमदारांनीही श्रीपाद नाईक यांच्याविरोधात काम केल्याची शक्यता आहेच. श्रीपाद नाईक यांच्यावरील नाराजीमुळे काही मतदारांनी त्यांना मतदान करायचे नाही असे ठरवले तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे रमाकांत खलप आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे (आरजीपी) मनोज परब असे दोन पर्याय होते. त्यामुळे आरजीपीचे मनोज परब यांनाही चांगल्यापैकी मते मिळतील. पण श्रीपाद नाईक यांच्या विरोधातील मतदानाचा जास्त फायदा रमाकांत खलप यांना होऊ शकतो. त्यामुळे श्रीपाद नाईक जिंकले तर भाजपच्या पारंपरिक मतदारांनी महिनाभर नाराजी व्यक्त करून शेवटी त्यांनाच मतदान केले असे स्पष्ट होईल. खलप जिंकले तर भाजपकडे कार्यकर्त्यांची फळी असूनही मतदारांनी स्वेच्छेने काँग्रेसला मतदान केले असा त्याचा अर्थ होईल. मनोज परब किती मते मिळवतात तेही पहावे लागेल. प्रस्थापितांच्या विरोधामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांनी परब यांना मतदान केले तर भाजपला कदाचित पराभव पत्करावा लागेल. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आरजीपीच्या उमेदवारांना उत्तर गोव्यात जेवढी मते मिळाली होती, त्यापेक्षा कमी मते परब यांना मिळाली तर त्या मतदानाचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. पण ती मते भाजपकडे जाण्याची शक्यता कमी आहे. शेवटी भाजपच्या पारंपरिक मतदारांनी श्रीपाद नाईक यांनाच मतदान केले तर त्यांचा विजय निश्चित आहे.

दक्षिण गोव्यातील राजकारण उत्तर गोव्यापेक्षा वेगळे. तिथे सासष्टी हा ख्रिस्ती बहुल तालुका. तिथे आठ मतदारसंघ आहेत. सुमारे २.४० लाख मते सासष्टीत आहेत. सासष्टीत जवळपास ७१ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे या वाढीव मतदानाचा धोका भाजपलाच जास्त आहे. सासष्टीत भाजपकडे तीन आमदार व एका अपक्षाची साथ असल्यामुळे सासष्टीतल्या वाढीव मतदानाची भरपाई उर्वरित भाजपकडे असलेल्या चार मतदारसंघांकडून झाली तर भाजपची धडगत आहे. अन्यथा हे वाढीव मतदान भाजपलाच नुकसानीचे ठरणार आहे.

मतदानानंतर भाजपच्या आजी-माजी आमदारांनी पक्षविरोधात काम केल्याचे आरोप सुरू केले. पण फोंडा, मडकई, शिरोडा, सावर्डे, सांगे, कुडचडे, काणकोण अशा मतदारसंघांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात. मुरगावमधील दाबोळी, वास्को, मुरगावमध्येही भाजपला चांगले मतदान झाल्याची शक्यता आहे. कुठ्ठाळी, केपे या दोन मतदारसंघांमधील मतदारांनी भाजपला साथ दिली असेल तर भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो जिंकू शकतात. दक्षिण गोव्याच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत सर्वांनीच मेहनत घेतली आहे. शिवाय २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यावेळी दक्षिण गोव्यात भाजपजवळ जास्त आमदार आहेत. सुदिन ढवळीकरही भाजपसोबत आहेत. त्यामुळे या सर्वांचा फायदा भाजपला मिळू शकतो. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांना फक्त पाच आमदारांचा पाठिंबा होता. हे पाचजण भाजपच्या बारा आणि भाजपसोबत असलेल्या तीन अशा एकूण पंधरा आमदारांवर भारी पडतात का ते पहावे लागेल.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.

९७६३१०६३००