एकदा काय झालं!

Story: छान छान गोष्ट |
05th May, 05:35 am
एकदा काय झालं!

एकदा काय झालं! चिंगी खार आपली अशीच हलतडुलत चालली होती. वाटेत तिला भेटली सगुणा साळुंकी. सगुणा म्हणाली, "काय चिंगे, मजेत ना? मोठी झालीस आता. एवढुशी होतीस गं बाई." "सगुणाक्का तुला काय काय आठवतं गं माझ्याबद्दल?" चिंगीने विचारलं. सगुणा साळुंकी म्हणाली, "बरंच काही आठवतं बाळा. ते दिवस मी कसे विसरेन? माझ्या आईबाबांच घरटं होतं सुंदरबनातल्या थोरल्या आंब्याच्या झाडावर. तुझी आई, कमुताई नं मी दोघी त्याच परिसरात मोठ्या झालो. काय परिसर होता तो. हिरवंगार वन होतं. जिकडे पहावं तिकडे गर्द झाडी. चिकू, पेरू, आंबा, बोरं, आवळा कितीक फळांवर ताव मारायचो आम्ही. कितीक खेळायचो आम्ही! मी सरसरसर झाडावर चढे नि तुझी आई उडत येऊन मला पकडे..मग मी तिला..अगदी मज्जा. आंब्याशेजारीच भुईमुगाचा मळा होता. कमुला खूपच आवडायच्या भुईमुगाच्या शेंगा. ती किनई पावसाळ्यासाठी झाडाच्या ढोलीत शेंगांची बेगमी करून ठेवायची, मलाही द्यायची. मीही कमुला दुरच्या बागेतल्या डाळिंबाचे दाणे आणून द्यायचे. छान रंगत चालली होती आमची मैत्री. एके दिवशी मी माझ्या आत्तेबहिणीला भेटण्यासाठी निघाले. कमुला तेव्हा नुकताच झुपकेदार शेपटीचा उमदा जोडीदार मिळाला होता. खरं सांगायचं तर माझ्यासाठी आत्तेबहिणीने स्थळं शोधणं सुरू केलं होतं आणि त्याचसाठी मला तिने बोलावलं होतं."

"मग गेलीस तू सगुणाक्का ?" चिंगीने विचारलं. " हो तर.  दोनचार स्थळांनी मला नकार दिला खरा पण एका साळुंक्याला मी आवडले. त्याची नं माझी लग्नगाठ बांधली गेली. आमचा संसार छान सुरळीत सुरू होता. पहिलं वर्षभर मी काहीना काही निमित्ताने माहेरी जायचे, सुंदरबन माझं स्वागत करायचं. माझे आईबाबा, सखेशेजारी अगदी लाडलाड करायचे आणि हो माझी सख्खी शेजारीण कमू, ती तर दोन गुलाबी बाळांची आई झाली होती. एक तू नं तुझा भाऊ सावन. मीच नावं ठेवली होती तुमची. तुमच्या बारशाला तर चिंचा, बोरे, आवळे काही विचारू नकोस..झक्कास गोड, आंबट, तुरट खिरापत होती. फुलांतला मध पाहुण्यांना इवल्या इवल्या पानांतून दिला होता. तुमचा पाळणा रंगीबेरंगी फुलांनी सजवला होता. तुम्ही दोघं भाऊबहीण पाळण्यात शेजारीशेजारी निजला होता. बस तेवढंच,  त्यानंतर मात्र माझं सुंदरबनात जाणं झालं नाही. घरी आले नं सासूबाई आजारी पडल्या, मग त्यांचं करणं ओघाने आलंच. साताठ महिने गेले असतील, सासूबाई खडखडीत बऱ्या झाल्या. माझं कौतुक करायच्या. सगळं छान चाललं होतं पण नं मला माहेराची आठवण येऊ लागली. एकदा माझ्या साळुंक्याला मी विचारलं. जाऊ का मी सुंदरबनी? तो म्हणाला, खरंच जा. मीही आलो असतो पण इथे घरट्याची डागडुजी राहिलीय ती पुरी करतो."

"मग.." चिंगीखार लक्ष देऊन सगुणाक्काची गजाल ऐकत होती. "मग काय. मी गेले उडत उडत पण... पण माझं सुंदरबन बेचिराख झालं होतं. तिथे बरीच व्रुक्षतोड चालू होती. यंत्रं आणली होती झाडं कापायला.  ती दणकट माणसं एकमेकांशी सल्लामसलत करून एकेका झाडावर धारदार पाती फिरवत होती. मला तर हुंदकाच आला. माझ्या आईवडिलांच घरटं असलेलं थोरल्या आंब्याचं झाडही धारातीर्थी पडलं होतं. तिथे होते काही निर्जीव ओंडके. कुठे गेली असतील ती दोघं? मी आक्रोश केला. तेव्हा कमु आली कुठुनशी. तिने मला पोटुशी धरलं. तिच्या नव्या घरट्यात घेऊन गेली. कमुताईने मला बळेबळे खाऊपिऊ घातलं. कमु म्हणाली, "अगं चिंगे एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं बघ. रात्रीची फुलं काढू नयेत सांगणारी संस्कृती आपली. या नराधमांनी रात्रीच येऊन आंब्याच्या झाडावर करवत चालवली. माझं बाळ, माझा सावन खाली पडला तिथेच गेला गं. चिंगीला मात्र रात्रभर घट्ट उराशी धरून राहिले होते. वैऱ्याची रात्र होती ती. तुझे जन्मदातेही निश्चल अवस्धेत पडलेले दिसले मला सकाळी. खूप आक्रोश केला. तेवढच तर होतं हातात. आपल्यासारख्या मुक्या प्राण्यांनी कुठे बरं दाद मागावी? कुणाकडे करावी या दानवांविरुद्ध तक्रार!"

काही दिवस मी कमुसोबत नदीकाठच्या झाडावर थांबले. कमुताईने मला आईवडलांची उणीव भासू दिली नाही. हवं नको ते करून घातलं. नंतरही मी जेव्हा जेव्हा कमुताईकडे जाई तेव्हा ती माझं माहेरपण करी."

"आपल्या आईबद्दल इतकं छान छान ऐकून चिंगीला खूप बरं वाटलं. तिनेही आपल्या आईसारखं खूप खूप गुणी खार व्हायचा निश्चय केला. चिंगीने घरी येताच आईला सगुणाक्का भेटली होती म्हणून सांगितलं आणि म्हणाली,"आई आई, तू जशी सगुणाक्काची संकटात मदत केलीस नं तशीच मीही कोण दु:खात, संकटात असलं की नक्की त्यांची मदत करेन. लोकं मग म्हणतील लेक कशी आईच्या गुणाची आहे. हो ना!"

कमुखारुताई लेकीचं बोलणं ऐकून खूप खूश झाली. पेरलं ते उगवतं ही म्हण तिच्याबाबतीत खरी ठरली होती.


गीता गजानन गरुड